आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: May 22, 2025 19:30 IST2025-05-22T19:29:23+5:302025-05-22T19:30:30+5:30

सावधान! तुम्ही जास्त किंवा कमी टीडीएसचे पाणी पीत नाही ना !

RO's ultra-pure water quenches thirst, but what are the benefits to the body? | आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

आरोच्या अतिशुद्ध पाण्यातून तहान भागते, पण शरीराला फायदा काय?

छत्रपती संभाजीनगर : ‘शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायीपाणी" असा समज बळावत चालला आहे. अतिशुद्ध पाणीच आरोग्य बिघडवत असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. आपल्या शुद्ध पाण्याविषयीच्या समजाला हे धक्का देणारं आहे. आरओ फिल्टरमधून मिळणाऱ्या अगदी कमी टीडीएस असलेल्या पाण्यामुळे शरीराला आवश्यक खनिजांचं प्रमाण कमी होऊ शकतं. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेलं पाणी दोन्ही अपायकारक असू शकतं. त्यामुळे सावधान! ‘शुद्धते’च्या अतिरेकाने आपलं आरोग्य धोक्यात तर येत नाही ना, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

लोकमतने शनिवारी शहरातील सिडकोतील जलकुंभ, छावणी-टिळकनगरातील आरो केंद्र, मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील हॉटेल, क्रांती चौकातील दुकान, पुंडलिनगरातील नळाचे पाणी व बीड बायपास येथील बोर, विहिरीचे व आरोच्या पाण्याची ‘टीडीएस’ चाचणी केली. यात अवघ्या ३० ते ४३० मि.ग्रॅ/लि. पर्यंतचे टीडीएस आढळून आले. आरो जार केंद्रात ३० ते ६० मि.ग्रॅ/लि. दरम्यान टीडीएसचे प्रमाण आढळून आले. मनपाच्या जलकुंभातील पाण्यात ३५० टीडीएस आढळून आले. याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केली. ५० पेक्षा कमी आणि १५० पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर काय म्हणाले...
१) पाण्यातील टीडीएस (टोटल डिसॉल्व्हड सॉलिड्स) म्हणजे पाण्यात विरघळलेले घनद्रव्य होय.
२) पिण्याच्या पाण्यात आदर्श टीडीएसचे प्रमाण ५० ते १५० मि.ग्रॅ/लि. असले पाहिजे.
३) ५० पेक्षा कमी टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला फिकट व नीरस लागते.
४) १५० पेक्षा जास्त टीडीएसचे पाणी पिले तर ते चवीला कडवट लागते.
५) पाण्यात कमी टीडीएस असेल तर कॅल्शियम, सोडियम, पोटेशियम, मॅग्नेशियम वेगवेगळ्या खनिजांची मात्रा, शरीरात कमी होऊ शकते.
६) कमी टीडीएसचे पाणी पिल्यास हाडे ठिसूळ होतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. उदा. सोडियम कमी झाले तर चक्कर येऊ शकते.
७) जास्त टीडीएसचे पाणी पिले तर खनिजांचे रक्तातील प्रमाण वाढू शकते. उदा. पोटॅशियम वाढले तर हृदयावर परिणाम होऊ शकतो.
८) जागतिक आरोग्य संघटनेनुसार ३०० मि.ग्रॅ./लि. पेक्षा कमी टीडीएस असल्यास ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.
९) पाण्याचे टीडीएस जास्त असल्यास पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. तसेच किडनीचे आजार होऊ शकतात.
१०) जास्त टीडीएसचे पाणी पिणाऱ्यांमध्ये मुतखड्याचे आजार जास्त दिसून येतात.

पिण्याच्या पाण्यात आढळणारे रासायनिक व जैविक घटक व त्यांचे शरीरावर होणारे परिणाम
स्त्रोत : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील पाणी तपासणी प्रयोगशाळेतून मिळालेली माहिती.
घटक (द्रव्य) - अतिरिक्त असल्यास शरीरावर होणारे परिणाम
१) विरघळलेले क्षार (टीडीएस)- हृदयाशी संबंधित आजार, रक्तवाहिन्यांचे विकार, कर्करोगाचे आजार, पचनसंस्थेतील बिघाड.
२) कठीणपणा - त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचारोग, मुतखडा
३) अल्कलायनिटी - उलटी, अस्वस्थता
४) क्लोराइड- पाण्यात खारटपणा जाणवतो.
५) कॅल्शियम--- त्वचा कोरडी होणे, केस कोरडे होणे, त्वचा रोग, मुतखडा
६) फ्लोराइड---हाडांचा ठिसूळपणा, उच्च रक्तदाब, दंतक्षय, दातांचा पिवळेपणा.
७) लोह-- मधुमेह, पोटाचे विकार, फफ्फुस, पचनग्रंथी, हृदयाचे विकार.
८) नायट्रेट- ब्लू बेबी सिंड्रोम.
९) सल्फेट- हगवण लागणे.
१०) कोलीफॉर्म--- उलट्या, मळमळ, गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ.
........................................
 

Web Title: RO's ultra-pure water quenches thirst, but what are the benefits to the body?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.