छत्रपती संभाजीनगरात उद्योजकाच्या घरात दरोडा; ८ किलो सोने, ४० किलो चांदी चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:41 IST2025-05-15T13:40:44+5:302025-05-15T13:41:02+5:30

बंगल्याची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर पिस्तूल धरून त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंडाला टेप लावली.

Robbery at the house of a businessman who has gone abroad in Chhatrapati Sambhajinagar; Eight kilos of gold, forty kilos of silver stolen | छत्रपती संभाजीनगरात उद्योजकाच्या घरात दरोडा; ८ किलो सोने, ४० किलो चांदी चोरीला

छत्रपती संभाजीनगरात उद्योजकाच्या घरात दरोडा; ८ किलो सोने, ४० किलो चांदी चोरीला

वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर): बजाजनगरमधील आर.एल. सेक्टर येथील प्लॉट क्रमांक ९३ वर असलेल्या नामवंत उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर गुरुवारी (१५ मे) पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला. या घटनेत आठ किलो सोने, चाळीस किलो चांदीचे दागिने आणि मोठी रोख रक्कम असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

संतोष लड्डा हे वाळूज एमआयडीसीमधील के-२३७ प्लॉटवर ‘दिशा ऑटो कॉम्प्स’ या कंपनीचे मालक असून, ८ मे रोजी ते कुटुंबासह परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत बंगल्याची देखरेख चालक संजय झळके करत होते. गुरुवारी पहाटे सुमारे दोनच्या सुमारास काही दरोडेखोरांनी झळके यांच्या डोक्यावर पिस्तूल धरून त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंडाला टेप लावली. त्यानंतर त्यांनी घरातील तिजोरी फोडून मौल्यवान ऐवज चोरून नेला. सकाळी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरीचा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक आयुक्त संजय सानप, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर गाडे, तसेच अन्य पोलिस अधिकारी, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज व फिंगरप्रिंटच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरोडेखोरांनी घरात प्रवेश कसा केला, त्यांचं नेटवर्क काय आहे याचा तपास गतीने सुरू आहे. या घटनेने बजाजनगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता वाढली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पुढील तपासादरम्यान घरातच दोन ते अडीच किलो सोने आणि आठ ते नऊ किलो चांदी आढळून आल्याचे पोलीस व नातेवाईकांनी सांगितले आहे.

Web Title: Robbery at the house of a businessman who has gone abroad in Chhatrapati Sambhajinagar; Eight kilos of gold, forty kilos of silver stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.