छत्रपती संभाजीनगर : कार्यालयातून रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या एका शासकीय महिला अधिकाऱ्यासोबत रिक्षाचालकाने पैशांवरून हुज्जत घालत आक्षेपार्ह कृत्य केले. त्यांना अश्लील स्पर्श करत बॅग, मोबाइल हिसकावून घेत शिवीगाळ केली. महिलेच्या मदतीसाठी धावलेल्या वाहतूक पोलिसांसोबत धक्काबुक्की केली. त्यांच्या हातातील चालान मशिन फेकून देत धमकावले. रिक्षाचालकांमधील वाढती गुन्हेगारी सिद्ध करणारी ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुख्य रेल्वे स्थानकावर घडली. युसुफ मोहम्मद अली अन्सारी (२७, रा. दौलताबाद), असे आरोपीचे नाव आहे.
भगवान महावीर चौक (बाबा चौक) परिसरातील एका शासकीय विभागात कार्यरत ३६ वर्षीय महिला अधिकारी रोज जालना ते शहरात अप-डाऊन करतात. सोमवारी दिवसभराचे काम आटोपून त्या सायंकाळी ६ वाजता कार्यालयासमोरून रिक्षात बसल्या. रेल्वे स्थानकावर रिक्षा पोहोचताच आरोपी युसूफ मोहम्मद याने त्यांच्यासोबत वाद घातला. महिला अधिकारी त्याला समजावून सांगत असताना त्याने आक्षेपार्ह कृत्य करत शिवीगाळ केली. महिलेच्या अंगावर धावून जात 'अब तू बहोत पछताएगी', असे म्हणत हाताला स्पर्श केला. त्यांच्या हातातील बॅग व मोबाइल हिसकावून घेत धमकावले. या प्रकारामुळे आरडाओरड ऐकू जाताच रस्त्यावर उभ्या वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार गिरी व राठोड हे महिलेच्या मदतीसाठी धावून गेले.
पोलिसांवरही अरेरावी, धक्काबुक्कीगिरी व राठोडने युसूफ मोहम्मदला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरच अरेरावी करत धक्काबुक्की केली. गिरी यांच्या हातातील चालान मशिन फेकून दिले. त्याचा धिंगाणा वाढत असताना वेदांतनगर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. त्याच्यावर महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून बीएनएस ७४ (विनयभंग), ३५२ (शांतताभंग करणे), ३५१-२ (धाकदपटशाही), ११९-१ (इच्छापूर्वक दुखापत पोहोचवून मालमत्ता हिसकावणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली असून, मंगळवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले.
रिक्षा व्यवसायात गुंडप्रवृत्तींची वाढ, रोखणार कोण ?-२७ जुलै रोजी आठवीतल्या मुलीला अश्लील स्पर्श करत रिक्षाचालकाने आक्षेपार्ह कृत्य केले.-२५ जुलै रोजी रात्री देविदास कदम (५५, रा. बीड बायपास) यांना रिक्षाचालकाने तीन तास शहरात फिरवत पिसादेवी येथे नेत पाठीत चाकूने वार करून लुटले.-१७ जुलै रोजी एका गरीब महिलेला आमखास परिसरात नेत रिक्षाचालकाने ५० हजार रुपयांना लुटले. या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला नाही.-१५ मे रोजी मोंढा परिसरात मद्यधुंद रिक्षाचालकाने भररस्त्यावर धिंगाणा घालत हुज्जत घातली.-६ एप्रिल रोजी अशोक खापे या रिक्षाचालकाने प्रवाशाच्या पोटात चाकू खुपसला.-सिडको व बाबा चौकात जानेवारी महिन्यात दोन रिक्षाचालकांनी पोलिसांवर हल्ला केला होता.