दमदार पावसाचा दिलासा
By Admin | Updated: August 28, 2014 01:40 IST2014-08-28T01:38:04+5:302014-08-28T01:40:06+5:30
उस्मानाबाद : मागील तीन महिन्यांपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना वरूणराजाने मोठा दिलासा दिला आहे.

दमदार पावसाचा दिलासा
उस्मानाबाद : मागील तीन महिन्यांपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना वरूणराजाने मोठा दिलासा दिला आहे. तीन दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. याबरोबरच पाणीसाठा वाढण्यास मदत झाल्याने टँकरची संख्याही झपाट्याने कमी होत आहे.
जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी अस्वस्थ झाला होता. मागील महिन्यातही पावसाची फारशी प्रगती दिसली नाही. त्यामुळे पेरण्यांबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता. पावसाळा कोरडा जात असल्याने जिल्ह्यासमोर पिण्याच्या पाण्याची टंचाईही उभी ठाकली होती. मात्र, मागील तीन दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने काही प्रमाणात सर्वसामान्यांबरोबरच प्रशासनानेही सुस्कारा सोडल्याचे चित्र आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत उस्मानाबाद तालुक्यात सरासरी ५६.३० मिमी पावसाची नोंद झाली. तुळजापूर २७, उमरगा ४४.४०, परंडा ४५.४०, लोहारा २४, भूम ३५.४०, कळंब १०.७० तर वाशी तालुक्यात २६.३० मिमी इतका पाऊस झाला. उस्मानाबाद शहरात मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास जोराचा पाऊस झाल्यानंतर पुन्हा रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती. या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. विशेष म्हणजे, डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक असलेल्या भोगावती पुलावरून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पाणी वाहत होते. शहरातील बार्शी बायपास रस्ता ते जिल्हा उद्योग केंद्र दरम्यान असलेल्या माणिक चौक ते शाहू नगर या रस्त्यावरील वाहतूक रात्री ठप्प झाली होती. याबरोबरच काकडे प्लॉट, आनंद नगर येथील काही घरांत पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. बुधवारी सकाळपासून शहरात अधूनमधून रिमझिम पाऊस सुरूच होता.
परंडा येथेही मंगळवारी जोरदार पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच मोठा पाऊस आहे. यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न काहीअंशी दूर होणार असून, रबीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
भूम परिसरातही मंगळवारी समाधानकारक पाऊस झाला. विशेषत: वालवड, पाथरूड, अंभी, ईट, माणकेश्वर परिसरात पावसाचा जोर होता. मागील तीन दिवसातील पावसामुळे टँकर आणि अधिग्रहणांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)
कळंब शहर आणि परिसरात मंगळवारी रात्री तसेच बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे मांजरा नदी भरून वाहू लागली आहे. तालुक्यातील मलकापूर साठवण तलावामध्ये १३ टक्के, येरमाळा तलावात ८ टक्के वाढ झाली असून, रायगव्हाण, देवधानोरा, शिराढोण, भाटसांगवी, आडसूळवाडी तलावातील पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. सद्यस्थितीत चोराखळीमध्ये ५१ टक्के पाणीसाठा झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा प्रकल्पात ९.३५ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक सुरू असल्याने तेरणाची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. भोगावती नदीपात्र दुथडी भरून वाहिल्याने राघुचीवाडी प्रकल्प भरला असून, सांडव्यातून पाणी बाहेर पडू लागले आहे. रूईभर नदीपात्रातही पाणीसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. लोहारा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी प्रकल्पातील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची गरज आहे.
बाणगंगा, वाकवड, कुंथलगिरी तुडूंब
भूम : तालुक्यात मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. सध्या पडणारा हा पाऊस खरीप पिकास उपयुक्त ठरणारा आहे. पावसात सातत्य राहिले तर तालुक्यातील पाणीपातळी वाढण्यास मदत होईल. दरम्यान, तालुक्यातील काही मध्यम व लघु तलाव सोडले तर अन्य प्रकल्पांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.
जून महिना कोरडा गेला. त्यात पुन्हा जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर २८ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली. जुलै महिन्यानंतर पाऊस गायब झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. परंतु, १९ आॅगस्टपासून पावसाने पुनरागमन केल्याने सध्या झालेला पाऊस खरीपास उपयुक्त ठरला आहे. पडणाऱ्या पावसाने खरीपामधील पिकांची वाढ चांगली होईल, असे शेतकऱ्यांतून सांगितले जाते. आणखी दोन-तीन मोठे पाऊस झाल्यास तालुक्यातील प्रकल्प व अन्य जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील वालवड, अंबी या सर्कलमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे. खरीप पिकांच्या वाढीसाठी पाऊस सध्या पडणारा उपयुक्त ठरला असला तरी भूगर्भातील पाणीसाठा वाढीसाठी या भागात आणखी पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यात सद्यस्थितीत तीनच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून काही प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर दोन प्रकल्पांमध्ये अद्यापि पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे आजही तालुक्यामध्ये १८ अँकरच्या माध्यमातून टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. (वार्ताहर)
परंडा : तालुक्यातील कात्राबाद पसिरामध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे शिवारातील पाझर तलाव तुडुंब भरला असून, या तलावाच्या सांडव्यातून पाणी विसर्ग न झाल्याने तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.
परंडा तालुक्यातील कात्राबाद शिवारात शिवराम बुवा मठाची शेतजमीन असून, या जमिनीमध्ये सीना-कोळेगाव विभागाने पाझर तलावाची निर्मिती केली आहे. गेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसाने हा पाझर तलाव पूर्णपणे भरला आहे. मात्र तलावाच्या सांडव्यातून पाणी विसर्ग होत नसल्याने तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत कात्राबादचे सरपंच सूर्यकांत बोराडे यांनी महसूल प्रशासनाशी संपर्क साधून हा धोका निदर्शनास आणून दिला आहे. त्यानंतर तहसीलदार स्वरुप कंकाळ यांनी संबंधित विभागास तलावाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, तलावाबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार स्वरुप कंकाळ तलावाची पाहणी करण्याकरिता घटनास्थळावर पोहोचले असून, त्यांच्यासोबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारीही गेले आहेत. (वार्ताहर)
या पाझर तलावाखाली शेकडो हेक्टर सुपीक जमीन आहे. तलाव फुटल्यास तलावाच्या पाण्याने जमीन वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तलाव फुटण्याची शक्यता असल्याने पाझर तलावाखाली येणारे शेतकरी नसीर शहाबर्फीवाले तसेच अन्य शेतकऱ्यांनी तहसीलदार कंकाळ यांची भेट घेऊन पाझर तलावाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचे सांगून या कामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणीही केली.