मुंबईहून पहाटे आगमन अन् ७ वाजता महापौर समीर राजूरकरांचा पाणी प्रश्नावर 'सर्जिकल स्ट्राईक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:35 IST2026-02-12T16:34:56+5:302026-02-12T16:35:26+5:30
सकाळी सात वाजताच महापौरांच्या अचानक पाहणीमुळे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

मुंबईहून पहाटे आगमन अन् ७ वाजता महापौर समीर राजूरकरांचा पाणी प्रश्नावर 'सर्जिकल स्ट्राईक'
छत्रपती संभाजीनगर : महापौर समीर राजूरकर बुधवारी पहाटे ६ वाजता मुंबईहून शहरात आले. घरात तासभर थांबून ७ पासून कामाला सुरुवात केली. स्वत:च्या वाहनातून त्यांनी पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा अंदाज घेण्यास सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या पाहणीमुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात सोमवारी महापौर आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
शहराला सध्या आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिनी फुटली, तांत्रिक बिघाड आदी कारणांमुळे आठवड्यात एकदा तरी पाणीपुरवठ्याचा दिवस पुढे ढकलण्यात येतो. फेब्रुवारीपासूनच शहरवासीयांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली. त्यामुळे विविध भागांत पाणीपुरवठ्याची मागणीही वाढू लागली. दरवर्षी उन्हाळ्यात शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. गुंठेवारी भागात टँकरची मागणी वाढते. नवीन पाणीपुरवठा योजनेत जानेवारीला अतिरिक्त पाणी मिळेल, असे जाहीर करण्यात आले होते. फेब्रुवारी महिना अर्धा उलटत आला तरी वाढीव २०० एमएलडी पाण्याची ‘चाचणी’ झाली नाही. किमान उन्हाळ्यापूर्वी तरी वाढीव पाणी शहराला मिळावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे.
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक संपताच समीर राजूरकर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईला कारने रवाना झाले होते. मध्यरात्री ते मुंबईहून निघाले आणि ६ वाजता आले. ७ वाजता कोणालाही न सांगता ते स्वत:च्या वाहनाने चिकलठाण्यात गेले. या भागातील पाणीपुरवठ्याचा अंदाज त्यांनी घेतला. नऊ, दहा दिवसांनंतर या भागाला पाणी मिळत असल्याचे समजले. पाहणीबाबत महापौरांनी कोणालाही माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधित नगरसेवकांचीही धावपळ उडाली. अधिकाऱ्यांनाही उशिरा माहिती मिळाली. सोमवारी आयुक्तांच्या उपस्थितीत पाणीपुरवठ्याची बैठक घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
९:३० वाजता कार्यालयात
सकाळी ९:३० वाजता महापौर कार्यालयात येऊन बसले. त्यानंतर त्यांना भेटायला येणाऱ्यांची रांगच लागली. दुपारी १ वाजेपर्यंत भेटीगाठी सुरू होत्या. दुपारी ४ नंतर परत कार्यालयात आल्यानंतर अभ्यागतांची रांग लागली होती.