नवीन पाणीपुरवठा योजनेतून डिसेंबर २०२४ ला मिळणार छत्रपती संभाजीनगरवासीयांना पाणी
By प्रभुदास पाटोळे | Updated: October 19, 2023 14:02 IST2023-10-19T14:01:05+5:302023-10-19T14:02:06+5:30
कंत्राटदारांची खंडपीठात विविध कामांच्या पूर्णत्वाची लेखी हमी

नवीन पाणीपुरवठा योजनेतून डिसेंबर २०२४ ला मिळणार छत्रपती संभाजीनगरवासीयांना पाणी
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेतील विविध कामांच्या पूर्णत्वाची लेखी हमी (बार चार्ट) कंत्राटदारांनी बुधवारी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठात सादर केली. त्यानुसार नवीन योजनेतून शहराला डिसेंबर २०२४ मध्ये पाणीपुरवठा केला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
शिवाय या योजनेतील विविध कामे केव्हा पूर्ण होऊ शकतील, याचेही वेळापत्रक कंत्राटदारांनी खंडपीठात सादर केले. त्यानुसार जायकवाडी येथील जॅकवेल, पंप हाऊस, ॲप्रोच ब्रिज, आदी कामे डिसेंबर २०२४ ला पूर्ण केली जातील. जायकवाडीपासून शहरापर्यंतच्या २५०० मिलिमीटर व्यासाच्या ३८.६ किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीचे काम फेब्रुवारी २०२४ ला पूर्ण होईल. जलशुद्धिकरण केंद्राचे काम फेब्रुवारी २०२४ ला पूर्ण होईल. शुद्ध पाण्याचा मुख्य साठा असलेल्या दोन ‘एमबीआर’चे काम मार्च २०२४ ला पूर्ण होईल. पैठण ते शहरापर्यंतच्या मुख्य गुरुत्ववाहिनीचे काम जुलै २०२४ ला पूर्ण होईल. योजनेतील एकूण ५३ टाक्यांपैकी हनुमान टेकडी आणि टीव्ही सेंटर येथील टाक्या वापरासाठी तयार आहेत. त्या दोन टाक्यांसह एकूण ११ टाक्यांचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. उर्वरित ४२ टाक्यांचे काम डिसेंबर २०२४ ला पूर्ण होईल, अशी लेखी हमी कंत्राटदारांनी खंडपीठात दिली.
पैठण ते औरंगाबादपर्यंतच्या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे चालू आहे. त्याचसोबत नवीन पाणीपुरवठा योजनेचेही काम चालू आहे. रस्ता व पाणीपुरवठा या दोन्हीही योजनांची कामे सोबतच पूर्ण व्हावीत, कारण जनतेच्या पैशातूनच ही कामे होत आहेत. खंडपीठ नियुक्त समितीने दोन्ही योजनांचा आढावा घ्यावा, असे ॲड. मनूरकर म्हणाले.
कंत्राटदारातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे व ॲड. संकेत सूर्यवंशी, मनपातर्फे ॲड. संभाजी टोपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख व ॲड. विनोद पाटील, मूळ याचिकाकर्ते ॲड. अमित मुखेडकर, न्यायालयाचे मित्र ॲड. सचिन देशमुख, मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे, ॲड. अनिल बजाज, राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे ॲड. दीपक मनूरकर, आदींनी काम पाहिले. या जनहित याचिकेवर २ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे.