वेदनेतून संशोधनाचा जन्म अन् दोन पेटंट; छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:30 IST2025-12-27T13:22:19+5:302025-12-27T13:30:27+5:30
"ज्या वेदनेतून मी गेलो, ती गरिबांच्या वाट्याला येऊ नये!"; १७ वर्षांच्या अर्णव महर्षीचा माणुसकीचा शोध; राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव.

वेदनेतून संशोधनाचा जन्म अन् दोन पेटंट; छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार
- प्रशांत तेलवाडकर
छत्रपती संभाजीनगर : ‘एका अपघातामुळे तीन वर्षापूर्वी अर्धांगवायू झाला...,पण त्या वेदनेत मी अडकलो नाही. मला उपचार मिळाले. घरचा भक्कम आधार होता. मात्र, ज्यांच्याकडे उपचारांचीही सोय नाही, त्या गरीब रुग्णांचे किती हाल होत असतील. या विचाराने मनात ‘घर’ केले. त्यातून माझ्या संशोधनाचा जन्म झाला.’ माझ्या दोन संशोधनांना पेटंट मिळाले आणि आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल वीर पुरस्कार मिळून त्यावर शिक्कामोर्तब झाले. माझे संशोधन येत्या काळात लाखो गरीब रुग्णांसाठी माणुसकीचा ‘हात’ ठरले, असा आत्मविश्वास १७ वर्षांच्या अर्णव महर्षी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगरातील अर्णवच्या संशोधनाची दखल घेत शुक्रवारी (दि. २६)नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्णवला ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (२०२५) प्रदान केला. अर्णव म्हणाला ‘राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना वर्तमानपत्रात व टीव्हीवर पाहत होतो. पण, त्यांच्याशी संवाद साधणं, हा माझ्या आयुष्यातील ऊर्जावान व सुवर्ण क्षण होता.’
पंतप्रधान म्हणाले...
तुझे संशोधन चालू ठेव. हे संशोधन मर्यादित ठेवू नको. अन्य लोकांना याचा कसा वापर करता येईल, त्यावर लक्ष केंद्रीत कर.
आजी म्हणाली अर्णव आमचा ‘श्वास’
अर्णवची आजी मीना महर्षी यांनी सांगितले की, माझा नातू आमचा ‘श्वास’ आहे. त्याचे वय १७ वर्षे व माझे वय ७० आहे. पण, आमच्या दोघात मैत्रीचे नाते आहे. आज त्याच्या संशोधनामुळे त्याने स्वत:च्या आजारावर ९० टक्क्यांपर्यंत मात केली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला, तेव्हा आमच्यासाठी आकाश ठेंगणे झाले, अशा भावना आजोबा ओमप्रकाश महर्षींनी व्यक्त केल्या.
अर्णवने कोणते संशोधन केले
१) अर्णव अपघातामुळे अनेक दिवस व्हीलचेअरवरच होता. ‘पॅरालाइज’ झालेली बाजू पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत होता. तेव्हा, त्यास जाणवले की, कमजोर हाताचा उपयोग केल्यास लवकर ताकद येते. त्यामुळे डॉक्टर कमजोर हाताचा वापर करण्यासाठी रुग्णाचा सुदृढ हात बांधतात. त्याचा विचार करून अर्णवने यंत्र शोधले.
२) हे यंत्र कमजोर हाताचा वापर करण्याची रुग्णाला सतत आठवण करून देते. व्हायब्रेटरी फिडबॅक देते. ‘रिस्ट बॅण्ड’ असलेले हे यंत्र कोठेही घालून जाता येते.
३) २०२३ मध्ये कॉम्पोनंट मायक्रोकंट्रोलर, लिथियम बॅटरी व व्हायब्रेशन मोटर यांचा वापर करून यंत्र बनवले, तेव्हा अर्णव ९ वीत होता.
४) अर्णवने एक ॲप्लिकेशन विकसित केले आहे. त्याचे नावही ‘फेअर चान्स’ म्हणजे फाइन मोटार्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिहॅबिलिटेशन चान्स असे ठेवले.
यांचे मोलाचे मार्गदर्शन
अर्णवच्या संशोधनासाठी त्याचे कुटुंबीय, डॉ. अश्विनी काळे, डॉ. शिल्पा काळे व अन्य रुग्णांचे मार्गदर्शन मिळाले. या पुरस्काराचे ते देखील माझ्या इतकेच मानकरी आहेत.
अर्धांगवायूवर मात करून दहावीत ९५.५ टक्के
एका विद्यार्थ्यांने दहावीच्या सीबीएसई परीक्षेत ९५.५ टक्के गुण मिळवीत यश मिळविले. अर्णव महर्षी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. अर्णवला ३ वर्षांपूर्वी अपघातात डोक्याला मार लागला होता. त्यात त्याला उजव्या बाजूचा पॅरालिसिस झाला. मुंबई येथे उपचारादरम्यान त्याचा उजवा हात काम करणार नाही, डाव्या हाताने लिहावे लागेल, असे सांगण्यात आले होते. परंतु अर्णवने मागे वळून पाहिलेच नाही. शाळा, अभ्यास आणि उपचार यांचा समतोल राखत तो तीन वर्षे सातत्याने चिकाटीने मेहनत करत राहिला. अखेर पॅरालिसिसवर मात करून दहावीच्या सीबीएसई परीक्षेत ९५.५ टक्के गुण मिळविले.