जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
By बापू सोळुंके | Updated: October 7, 2025 13:56 IST2025-10-07T13:55:44+5:302025-10-07T13:56:12+5:30
प्रक्षोभक नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या! जरांगेंचा भुजबळ आणि तायवाडे यांच्या मागणीला पलटवार

जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आजपर्यंत तीवेळा आरक्षण मिळाले, प्रत्येकवेळी आमच्या आरक्षणाविरोधात जाऊन आरक्षण रद्द केले. सध्याच्या १० टक्के आरक्षणाविरोधात तसेच २ सप्टेंबरच्या जी.आर. विरोधात ओबीसी नेत्यांनी याचिका दाखल केल्या आहेत. यामुळे आम्हीही त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. यासाठी ओबीसींना मिळालेल्या १९९४ सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार असल्याचे मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी मंगळवारी (दि.७) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाज मोठ्या संघर्षातून आरक्षण मिळवत आला आहे. आमच्या गरीबांची मुलं शिकले नाही पाहिजे, ते मोठी होवू नये, यासाठी आमच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या.नारायण राणे यांनी दिलेले आरक्षण घालवले, फडणवीस यांनी दिलेल्या सन २०१८ मधील आरक्षण घालवले. आता गतवर्षी दिलेल्या आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आल्या. एवढेच नव्हे तर आमच्या जी.आर. विरोधातही त्यांनी याचिका दाखल केल्या. मंत्री छगन भुजबळ यांनी सात याचिका दाखल केल्याचे जाहिर सांगितले आहे. आम्ही तुमच्या आरक्षणाविरोधात कधी याचिका दाखल केल्या नाही. तरीही तुम्ही मराठ्यांच्या विरोधात जात आहात, म्हणून आम्ही हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. ओबीसी नेत्यांना जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. यासाठी पुढील आठवड्यात दिल्लीला आणि नंतर मुंबईला जाणार आहे. तेथे विधीज्ञांशी बोलून १९९४च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे जरांगे म्हणाले.
मी प्रक्षोभक बोलत नाही!
ओबीसी नेते तायवाडे यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले की, मी कुठं प्रक्षोभक बोलतो. आम्ही शांततेत आंदोलन करीत होतो, तेव्हा छगन भुजबळ यांनी अंबड येथे येऊन काेयत्याची भाषा केली होती. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी का केली नाही? मी भडखाऊ भाषण केले नाही, मी मराठ्यांच्या व्यथा मांडल्या. उलट त्यांनी जातीयवाद केला. त्यांना आतून मराठ्यांना संपवायचे आहे, त्यासाठी 'माधव' पॅटर्न त्यांनी आणला होता,असे ते म्हणाले. तुम्ही जातीयवाद केला म्हणून तुमच्यावर गुन्हे दाखल होतात, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही सोडणार नाही
मराठ्यांना आरक्षण देऊ नये, असे काँग्रेसवाले का बोलत आहे. आमच्यावर बोलला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी विजय वडेट्टिवार यांना दिला. काँग्रेसने दलित, मुस्लिमांना वाऱ्यावर सोडून दिले. या दोन्ही समाजाविषयी ते काहीच बोलत नाही.