समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:40 IST2025-09-10T11:34:57+5:302025-09-10T11:40:59+5:30
वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
छत्रपती संभाजीनगर: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळच्या सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी शेकडो खिळे ठोकल्याचे मंगळवारी रात्री आढळून आले आहे. यामुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले असून, या खिळ्यांमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती सुरू होती की हा घातपाताचा प्रयत्न होता असा सवाल उपस्थित होत आहे.
हा प्रकार काही वाहनधारकांनी घटनास्थळापासून व्हिडिओ करून समोर आणला. व्हिडिओमधील माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. अशातच, रस्त्याच्या काही भागावर हे खिळे ठोकण्यात आले होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना नव्हती, किंवा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा फलकही लावलेला नव्हता. त्यामुळे, अनेक वाहनचालकांना या खिळ्यांचा अंदाज आला नाही आणि त्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समृद्धी महामार्गावर असे प्रकार याआधीही घडले आहेत. त्यामुळे, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून घातपाताचा प्रयत्न?
समृद्धी महामार्गावरील ही घटना केवळ अपघात किंवा निष्काळजीपणा नसून, त्यामागे घातपाताचा किंवा लुटमारीचा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने रस्त्यावर शेकडो खिळे ठोकले गेले होते, ते पाहता हा एखाद्या कटाचा भाग वाटतो. या खिळ्यांमुळे गाड्यांचे टायर पंक्चर झाल्यानंतर चालक मदतीसाठी थांबतो, अशा वेळी त्यांना लुटण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. यामुळे, हा फक्त अपघात नसून, वाहनचालकांना अडकवून त्यांना लुटण्याचा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वाहनधारकांनी म्हंटले आहे. दरम्यान, काहींच्या मते हे खिळे नसून छोटे पाइप आहेत, या द्वारे महामार्ग दुरुस्तीसाठी केमिकल सोडण्यात येत होते. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गाच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'अधिकारी आणि कंत्राटदारांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही का?' असा सवाल अनेक वाहनचालकांनी विचारला आहे. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून मागून येणाऱ्या गाड्यांना सूचना देऊन सावध केले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
पोलिसांचे सहकार्य नसते
या घटनेचा अनुभव घेतलेल्या संतोष सानप नावाच्या प्रवाशाने सांगितले की, "मी कुटुंबासोबत जालना येथून पनवेलला जात होतो. माझ्या गाडीसोबत अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले. यापूर्वीही माझ्यासोबत असे घडले आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावरही कोणतेही सहकार्य मिळत नाही. प्रशासन आणि कंत्राटदार नेमके काय करत आहेत?"