लाल मिरचीचा सर्वसामान्यांच्या खिशाला 'तिखट' तडका! आवक घटल्याने दरात मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:36 IST2026-02-14T17:36:24+5:302026-02-14T17:36:55+5:30
गृहिणींचे बजेट कोलमडले

लाल मिरचीचा सर्वसामान्यांच्या खिशाला 'तिखट' तडका! आवक घटल्याने दरात मोठी वाढ
छत्रपती संभाजीनगर : जेवणाची चव वाढवणारी लाल मिरची आता ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणार, अशी चिन्हे दिसत आहेत. अतिपाऊस आणि घटलेले उत्पादन यामुळे लाल मिरचीच्या दरात क्विंटलमागे ३० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, हा ‘तिखट तडका’ आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.
शहरात लाल मिरचीचे दर किती?
प्रकार १३ जानेवारी (प्रति किलो) १३ फेब्रुवारी
लवंगी- १८० ते २०० रु. --- १८० ते २५० रु.
तेजा- १८० ते २५० ---२४० ते ३००
चपाटा- १८० ते २५० -- २५० ते ३५०
रसगुल्ला- ३०० ते ४०० -- ४५० ते ५००
कश्मिरी--४०० ते ४५० -- ४५० ते ५५०
बेडगी--२५० ते ३०० -- ३५० ते ४५०
गुंटूर- १८० ते २०० -- २४० ते २८०
भाववाढीची कारणे
अतिवृष्टी : ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणा आणि आंध्रातील ४५-४६ टक्के जमिनीवरील पिके नष्ट झाली. परिणामी, प्रति हेक्टर उत्पादनात २३-२४ टक्के घट.
कमी लागवड : गेल्या दोन वर्षात योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरचीऐवजी मक्याला पसंती दिली. यामुळे मिरचीची लागवड २० टक्क्यांनी घटली.
मजुरीचा खर्च : मिरची तोडणीचा खर्च वाढल्याने उत्तर भारतातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.
आणखी भाववाढीची शक्यता
दक्षिण भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये (गुंटूर, खम्मम, वारंगल) मालाची आवक कमी आहे. कोल्ड स्टोअरेजमधील सुमारे ८५ टक्के माल संपत आला आहे. व्यापाऱ्यांकडे जुना साठा अत्यंत कमी आहे. उन्हाळ्यात गरम मसाला करण्यासाठी उद्योगांकडून व घरगुती मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
स्वप्नील जैन, व्यापारी
भाववाढीचा व्यापाऱ्यांनाही फटका
खरेदीसाठी येणारे १० पैकी ७ ग्राहक लाल मिरचीचे वाढलेले भाव पाहून तसेच परत जात आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. कारण, दिवसेंदिवस लाल मिरचीमधील ओलसरपणा कमी होतो व वजन घटत जाते. हे नुकसानदायकच ठरते.