छत्रपती संभाजीनगरात थंडीचा रेकॉर्ड ब्रेक: पारा १० अंशावर, का वाढली आहे थंडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 14:10 IST2025-12-09T14:05:30+5:302025-12-09T14:10:01+5:30
दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे.

छत्रपती संभाजीनगरात थंडीचा रेकॉर्ड ब्रेक: पारा १० अंशावर, का वाढली आहे थंडी?
छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या हिवाळ्यातील तापमान घसरण्याचा रेकॉर्ड सोमवार ८ डिसेंबर रोजी झाला. दिवसभरात किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. तर कमाल तापमान ३०.४ अंशावर होते. या हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. सकाळी थंड वाऱ्यामुळे चांगलीच हुडहुडी भरते आहे. यंदा ९ नोव्हेंबरपासून थंडी जाणवण्यास सुरूवात झाली. २२ ते २९ नोव्हेंबर दरम्यान थंडी गायब झाली होती. १ डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे पुनरागमन झाले. सकाळपासून थंडी जाणवत आहे.
सकाळी बाहेर पडणारे, उबदार कपड्यांसह बाहेर पडत आहेत. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत असून सायंकाळी गार वाऱ्यासह थंडीचा कडाका बसतो आहे. दिवसा कोरडे व सौम्य ऊन पडत आहे. तर सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढतो आहे. गेल्या पंधरवड्यापासून तापमान कमी-जास्त झाल्यानंतर या आठवड्यापासून थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे.
थंडीमुळे सकाळच्या वेळी रस्त्यांवर गर्दी कमी दिसत आहे. सकाळी शाळा व महाविद्यालयांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्यांनी थंडीपासून बचावासाठी जॅकेट, मफलर वापरायला सुरुवात केली आहे.
का वाढली आहे थंडी ...
नोव्हेंबरमध्ये किमान तापमान घसरण्याचा यंदाच्या हिवाळ्यातील पहिला रेकॉर्ड झाला. २ नोव्हेंबर २०२५ रोजी कमाल ३२ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस होते. ९ नोव्हेंबरला ३०.४ कमाल तर १२.८ किमान तापमान नोंदविले गेले. १९ नोव्हेंबर रोजी किमान तापमान १०.६ अंशावर होते. ३० नोव्हेंरबर रोजी १०.२ तर ८ डिसेंबर रोजी कमाल तापमान ३०.४ तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर गेले होते. दरम्यान हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले, उत्तरेकडील ध्रुवीय वारे मराठवाड्यात स्थिरावले असल्याने थंडीचा जोर वाढला आहे.