नामांकित पुरस्कारांचे आमिष; आयएएस अधिकारी, मंत्र्यांच्या शिफारसपत्रांचा ढीग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:07 IST2025-12-09T13:06:58+5:302025-12-09T13:07:31+5:30
तोतया अधिकारी, एजंटांवर विश्वास ठेवून अनेकांनी प्रस्ताव तयार केल्याचा संशय

नामांकित पुरस्कारांचे आमिष; आयएएस अधिकारी, मंत्र्यांच्या शिफारसपत्रांचा ढीग
छत्रपती संभाजीनगर : तोतया आयएएस अधिकारी व अन्य एजंटांनी मिळून अनेकांना देशाचे सर्वोच्च, नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचे आमिष दाखवण्याचे सत्र सुरू केले होते. यात शहरातील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालांपासून ते कॅबिनेट मंत्री, आयएएस अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेले सन्मानपत्र, शिफारसपत्र तयार केले. या रॅकेटच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा देशातील नामांकित पुरस्कारासाठी ५० ते ६० सन्मानपत्र, शिफारसपत्रांच्या फाईलसह प्रस्ताव तयार होता. पोलिसांनी यातील रमेश नामक व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
२३ नोव्हेंबरला तोतया महिला आयएएस अधिकारी कल्पना भागवतच्या अटकेनंतर अनेक तोतया ओएएसडी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांसह पुरस्कार, बदल्या करून देणाऱ्या एजंटचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. यात शनिवारी सिडको पोलिसांनी कल्पनाला ७ लाख ८५ हजार रुपये पाठवून शासकीय नोकरी सोडून गलेलठ्ठ पैसे कमावून देण्याचे आमिष दाखवणारा श्रीगोंद्याचा जमीन व्यावसायिक दत्तात्रय शेटे यालाही अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत असलेल्या शेटेची सिडको पोलिस चौकशी करत आहेत. शेटेने कल्पनासह कोणाला कोणाला नियुक्ती, बदली व पुरस्कारासाठी गळी उतरवले, यासाठी त्याच्या मोबाइलचाही तपास सुरू आहे.
शेटेमार्फतच रमेशची ओळख
कल्पनाला पैसे पाठवलेल्या व्यक्तींच्या यादीत रमेश नामक व्यक्तीने दोन लाख २५ हजार रुपये पाठवल्याचे बँक स्टेटमेंटद्वारे समजले आहे. रमेशची ओळख शेटेमार्फत झाल्याचे कल्पनाने चौकशीत सांगितले. शहरातील रहिवासी रमेश स्वत: सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगतात.
अशरफ, डिम्पीला आज हजर करणार
अटकेत असलेल्या मोहम्मद अशरफ गिल व तोतया ओएसडी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई या दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. त्यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल. अधिक चौकशीसाठी त्यांची वाढीव पोलिस कोठडी मागण्याच्या तयारीत पोलिस आहेत. सहा दिवसांपासून डिम्पीचे कुटुंब त्याच्या जामिनासाठी एका प्रार्थनास्थळात मुक्कामी आहे.
३० सन्मानपत्र, १४ शिफारसपत्र
सामाजिक कार्यकर्ता सांगणाऱ्या रमेश यांच्या नावे तब्बल ३० सन्मानपत्र, तर देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी १४ राज्यांतील विधानसभेचे उच्चपदस्थ अधिकारी, कॅबिनेट मंत्री, नामांकित कीर्तनकार, राजघराण्यातील व्यक्ती, आमदार, आयएएस, पोलिस अधिकारी, नामांकित रुग्णालयाचे अध्यक्षांचे सन्मानपत्र, शिफारसपत्राची फाईल समोर आली आहे. हे सर्व पत्र त्यांनी अर्जासोबत जोडले होते. या रॅकेटच्या सूत्रधारांच्या सांगण्यावरून अनेकांनी नामांकित पुरस्कारासाठी अशा फाईल तयार केल्या होत्या. ऑगस्ट, २०२३ मध्ये तयार झालेले अर्ज शासनाला सादर झाले की नाही, हे शिफारसपत्र खरे की खोटे, हे मात्र कळू शकले नाही.