रॅपर राज मुंगासेचा शोध लागला; अटकपूर्व जामीन मिळाल्याची अंबादास दानवेंनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 15:08 IST2023-04-12T15:07:29+5:302023-04-12T15:08:13+5:30
विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे.

रॅपर राज मुंगासेचा शोध लागला; अटकपूर्व जामीन मिळाल्याची अंबादास दानवेंनी दिली माहिती
छत्रपती संभाजीनगर: “ ५०खोके घेऊन चोर आले, चोर आले पाहा ओके होऊन” असे बोल असलेले रॅप सध्या तुफान व्हायरल झाले आहे. मात्र, याचा निर्माता रॅपर राज मुंगासेला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. शिंदे गटाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून रॅपर राज कुठे आहे याची माहिती नव्हती. पोलिसांनी अटक केली असेल तर तो कोणत्या ठाण्यात आहे याची माहिती मिळत नसल्याने राजच्या नातेवाईकांनी देखील याबाबत काळजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज फेसबुकवर रॅपर राजसोबत फोटो शेअर करत कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रॅपर राजचा “ ५०खोके घेऊन चोर आले” हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अल्पवधीतच तो लोकप्रिय झाला. मात्र, या गाण्यातून शिंदे गटाची, आमदारांची बदनामी होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाच्यावतीने रॅपर राज मुंगासेवर अंबरनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून राज गायब होता. कधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तर कधी जालना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची चर्चा होती. त्याच्या अटकेची अधिकृत माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांसह अनेक राजकीय नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. यावरून शिंदे-भाजप सरकारला टीकेचे लक्ष करण्यात आले आहे.
कल्याण न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
अखेर रॅपर राज मुंगासेचा शोध लागला आहे. आज विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज सोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी राज याला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केल्याची माहिती दिली. राज्यात सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे गुन्हा आहे. युवकांवर, कलाकारांवर गुन्हा दाखल करून तरुणांचे भविष्य हे सरकार उद्ध्वस्त करत आहे, आम्ही यांच्या पाठीशी सर्व ताककदीनिशी उभे असू, अशी ग्वाही देखील दानवे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे.