संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:45 IST2025-09-27T19:42:07+5:302025-09-27T19:45:57+5:30
विजांच्या कडकडाटासह आठही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट!
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने शनिवारी (२७ सप्टेंबर) आणि रविवारी (२८ सप्टेंबर) या दोन दिवशी विभागातील आठही जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. त्यानुसार आज सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. उद्या देखील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपले असून मनुष्यहानीसह, पशुधनहानी आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील काही भागात सकाळी, तर काही भागात सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. प्रशासनाने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा अंदाज: वेळ: पावसाची शक्यता असलेले जिल्हे
२७ सप्टेंबर: स. ८ ते २ वाजेपर्यंत नांदेड, लातूर
२७ सप्टेंबर : दु. २ ते रात्री ८ वाजेपर्यंत धाराशिव, लातूर, नांदेड
२७ सप्टेंबर: रा. ८ ते रा. १२ पर्यंत धाराशिव, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी
२८ सप्टेंबर: रा. १२ ते सकाळी ६ पर्यंत छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड
२८ सप्टेंबर: स. ६ ते दु. १२ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर, बीड.
२८ सप्टेंबर: दु. १२ ते सायं. ६ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर