अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 14:33 IST2020-03-26T14:31:44+5:302020-03-26T14:33:42+5:30
खुलताबाद तालुक्यात वादळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले असून ऊस , बाजरी आडवी झाली आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; काढणीला आलेल्या पिकाचे मोठे नुकसान
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यात सांयकाळी व रात्री झालेल्या वादळी वा-यासह मुसळधार पावसाने उन्हाळी बाजरी, ऊस आडवे झाले. सोंगणीला आलेला गव्हू व हरभरा ओला झाला तर आंब्याच्या लगडलेल्या कै-या पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडूूून पंचनामे करण्याची मागणी होत आहेे.
खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद शहर परिसर , गदाणा , टाकळी राजेराय , धामणगाव, सुलतानपूर , भांडेगाव , वडोद, येसगाव, खिर्डी , मावसाळा , सुलतानपूर गल्लेबोरगाव , वेरूळ , कसाबखेडा शिवारात जोरदार वादळी वा-यासह तास दोनतास झालेल्या मुसळधार पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी सुसाट वारे असल्यानेे ऊस, उन्हाळी बाजरी संपुर्ण आडवी झाली आहे तर सोंगणीसाठी आलेला गव्हू व हरभरा याचे ही मोठे नुकसान झाले आहे.
भांडेगाव येथील युवा शेतकरी गणेश पोपटराव चव्हाण म्हणाले की वादळी पावसामुळे मुख्यतः बाजरी हरभरा व आंबे तसेच ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावर्षी शेवटी शेवटी जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मी दोन एकर बाजरी चे बेड पद्धतीने लागवड केली होती बाजरी दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे वाऱ्यामुळे बाजरी आडवी पडली तसेच आंब्याला मोहर व छोटे-छोटे आंबे आलेले होते तेसुद्धा गळाली तसेच माझ्याकडे एक एकर कृष्णा या जातीचा ऊस रसवंतीसाठी लागवड केलेला होता पण त्याच्यावरही कोरोना चे सावट आले तसाच पडून असल्यामुळे तोही रात्रीच्या वाऱ्याने आडवा पडला त्याच प्रमाणे हरभरा हा दोन एकर क्षेत्रावर केला होता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पूर्ण हरभरा व्यवस्थित झाकलेला होता तरीसुद्धा वारे इतके होते की त्या वाऱ्यामुळे झाकलेल्या हरभऱ्यावर चे कापड उडून गेले व हरभरा पूर्ण ओला झाला.
विरमगाव येथील भीमराव धनाजी जाधव म्हणाले की माझ्या शेतातील ऊस आडवा झाला तर इतर पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक , तलाठी, कृषी सहाय्यक गायब असल्याने पंचनामे होण्यास अद्याप सुरूवात झाली नाही.