वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:44 IST2025-06-13T12:04:32+5:302025-06-13T13:44:22+5:30

सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत मृताच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

Rada in Vaijapur! Two groups clash over old dispute; Three stabbed, one dies | वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

वैजापूरात राडा! जुन्या वादातून दोन गट भिडले; तिघांना भोसकले, एकाचा मृत्यू

- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर :
तालुक्यातील खंडाळा येथे युवकांच्या दोन गटांत गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास झालेल्या वादातून तिघांना चाकूने भोसकण्यात आले. यातील एकाचा मृत्यू झाला. मोईन मुक्तार शहा (वय २४ वर्षे) असे मयताचे नाव आहे, तर शेख अबरार आरीफ शेख ( वय २३) व शोएब असीम पठाण (वय २३) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

खंडाळा येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास युवकांच्या दोन गटात वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांवर चालून गेल्या. यावेळी मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण या तिघांना काहींनी चाकूने भोसकले. यातील मोईन मुक्तार शहा याचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मयताचा मृतदेहही उपजिल्हा रुग्णालयातच आणण्यात आला. यावेळी संतप्त जमावाने उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. तसेच आतील कागदपत्रे फेकून दिली.

दरम्यान, खंडाळा गावातील एकाच्या दुकानातील साहित्यही बाहेर काढून संतप्त जमावाने पेटून दिले. तसेच भायगाव येथील एका सलूनच्या दुकानातील साहित्यही जमावाने बाहेर फेकून पेटवून दिले. या घटनेमुळे खंडाळा गावात व वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला आहे. ही घटना जुन्या वादातून झाल्याचा अंदाज असून या प्रकरणी गौरव राजु अनर्थ ( रा. भायगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्नावरे, नंदु पोपट जानराव ( सर्व रा. खंडाळा) आणि अन्य तिघे या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव राजु अनर्थ याने साथीदारांच्या मदतीने मोईन मुक्तार शहा, शेख अबरार आरीफ, शोएब असीम पठाण यांच्यावर चाकूने वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. रात्री पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी गावास भेट देऊन पाहणी केली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, दोन आरोपी ताब्यात
दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयात मृत मोईन मुक्तार शहा याचे नातेवाईक मोठ्याप्रमाणावर जमले आहे. आरोपींच्या अटकेची मागणी करत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. नातेवाइकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी पहाटे २ वाजता ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

परिस्थिती नियंत्रणात, कोणीही अफवा पसरवू नये
जुन्या वादातून स्टेटस ठेवल्यावरून हे वाद झाले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कारवाई करण्यात येत आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये.  परिस्थिती नियंत्रणात असून शांतता आहे. घडलेल्या घटनेशी संबंधित प्रत्येक दोषीवर निश्चित कारवाई होईल.
-सत्यजित ताईतवाले, पोलीस निरीक्षक, वैजापूर पोलीस ठाणे.

Web Title: Rada in Vaijapur! Two groups clash over old dispute; Three stabbed, one dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.