रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन
By बापू सोळुंके | Updated: February 21, 2024 19:02 IST2024-02-21T19:00:48+5:302024-02-21T19:02:10+5:30
जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यात पाणी सोडावे, या मागणीसाठी सिंचन भवनसमोर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले

रब्बी पिके वाळू लागली, पाणी सोडा; परभणीच्या शेतकऱ्यांचे सिंचन भवनसमोर आंदोलन
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळग्रस्त परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी न सोडल्यामुळे रब्बीची पिके वाळू लागली आहेत. सोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे या बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या बॅनरखाली शेतकऱ्यांनी बुधवारी सिंचन भवनसमोर धरणे देत निदर्शने केली.
‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजेपासून जालन रोडवरील सिंचन भवन समोर धरणे धरले. या आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘कडा’ प्रशासकांनी नुकतेच हिरडपुरी आणि आपेगाव बंधाऱ्यासाठी पाणी सोडले आहे.
मात्र,अद्यापही ढालेगाव उच्चस्तरीय बंधारा, मंगरूळ, लोणी सावंगी, तारूगव्हाण आणि दिग्रस बंधाऱ्यात जायकवाडी प्रकल्पातून पाणी सोडले नाही. यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, तातडीने पाणी सोडावे, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनात शिवाजी कदम, ज्ञानेश्वर काळे, अमृत गिराम, पांडुरंग गिराम, विलास दळवे, प्रकाश गिराम, वसंतराव गिराम आदींनी सहभाग नोंदविला.