'हल्लेखोर दीपक काटेसह सहकाऱ्यांवर मोक्का लावा'; सकल मराठा समाजाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:07 IST2025-07-15T20:07:37+5:302025-07-15T20:07:58+5:30
सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.

'हल्लेखोर दीपक काटेसह सहकाऱ्यांवर मोक्का लावा'; सकल मराठा समाजाची मागणी
छत्रपती संभाजीनगर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर १४ जुलै रोजी अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारी क्रांतीचौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दीपक काटे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याने साथीदारांसह शाईफेक करुन त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलने होत आहे. मंगळवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय,फडवणीस सरकार हाय हाय, प्रदीप दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, दिपक काटे याचा डीएनए तपासला पाहिजे अशा घोषणा दिल्या.
सदर आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, आत्माराम शिंदे, राहुल बनसोड, वैभव बोडखे, बाबासाहेब दाभाडे, रवींद्र काळे, शिरवत, झुंजार छावाचे अध्यक्ष सुनील कोटकर, अरुण नवले, बुलंद छावा संघटना सरचिटणीस सुरेश वाकडे, जयाजी सुर्यवंशी, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक मोरे, किरण काळे, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती मांडकीकर,ॲड. वैशाली कडू पाटील, रेखा वाहटुळे, सुकन्या भोसले, दिपाली बोरसे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
दीपक काटेवर मोक्कांतर्गत कारवाई करा
आरोपी काटेवर अवैध शस्त्र बाळगणे, खून करणे, खंडणी मागणे अशी विविध गुन्हे नोंद आहे. या अट्टल गुन्हेगारावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला.