ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:58 IST2025-12-24T14:57:45+5:302025-12-24T14:58:38+5:30
आता आणखी एक दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा

ट्रान्सफार्मर ट्रिपमुळे ११ तास पम्पिंग बंद; छत्रपती संभाजीनगराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे
छत्रपती संभाजीनगर : शनिवारी (दि. २०) जायकवाडीत मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा तब्बल २० तास बंद होता. त्यामुळे पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला. या घटनेला उलटून दोन दिवसही झालेले नसताना मंगळवारी पहाटे साडेचारला फारोळा येथे ट्रान्सफार्मर ट्रिप झाल्याने ११ तास पम्पिंग बंद ठेवावी लागल्याने बुधवारी ज्या वसाहतींना पाणी मिळणार होते, त्यांना आता गुरुवारी पाणी मिळेल. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार हवालदिल झाले आहेत.
गत काही दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू असताना अचानक शनिवारी जायकवाडी पंपहाऊसपासून जवळच १,२०० मि.मी. व्यासाची मोठी जलवाहिनी फुटली. ती रविवारी दुपारी १२ वाजता दुरुस्त झाल्यानंतर शहरात पाणी आणण्यासाठी सायंकाळी झाली. रविवारी ज्या वसाहतींना पाणी मिळाले नाही, त्यांना सोमवारी देण्यात आले. मंगळवारी पहाटेपर्यंत फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात अचानक वीजपुरवठा खंडित झाला. पॅनल, विद्युत उपकेंद्रांची तपासणी करून सकाळी सहाला पर्यायी विद्युत पुरवठा सुरू केला. त्यानंतर लगेच २२० केव्ही फिडरमध्ये ट्रिपिंग झाले. महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी यांनी बिडकीनच्या ३३ केव्ही फिडरवरून वीजपुरवठा घेण्यात आला. ९०० आणि ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी सुरू केली. १,२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी पंपहाऊसमधील सर्व उपकरणांची तपासणी करण्यात आली. त्यात ट्रान्सफार्मरमधील बिघाड निदर्शनास आला. त्याची दुरुस्ती करून विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी दुपारचे ३ वाजले. त्यानंतर पहिला पंप सुरू करून शहरात पाणी आणण्यास सुरुवात केली.
मनपाकडून दिलगिरी
११ तास शहराचा पाणीपुरवठा बंद असल्याने बुधवारी विविध वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागेल. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल पाणीपुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली. शहराचा पाणीपुरवठा आणखी एक दिवस पुढे ढकलावा लागेल, असेही सांगण्यात आले.
माजी, इच्छुक त्रस्त
शहरातील अनेक माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांचे राजकारण पाणीपुरवठ्यावर आहे. पाणी कधी येणार, येणार किंवा नाही, याची माहिती नागरिकांना व्हॉटसॲपवर देतात. मंगळवारी माजी नगरसेवक आणि इच्छुकांना नागरिकांनी पाणीप्रश्नांवर भांडावून सोडले होते.