आंदोलकांनी अडवला राज्यपाल बागडेंचा ताफा; राज्यासह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:26 IST2025-06-23T12:25:56+5:302025-06-23T12:26:31+5:30

पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

Protesters block Governor Haribhau Bagde's convoy; Rajasthan police on alert | आंदोलकांनी अडवला राज्यपाल बागडेंचा ताफा; राज्यासह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट

आंदोलकांनी अडवला राज्यपाल बागडेंचा ताफा; राज्यासह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्याकडून शहराकडे येत असताना, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा संजयनगर, मुकुंदवाडी प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी अडवला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. तीन-चार पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना पाठीमागे ढकलले. त्यानंतर, ताफा नियोजित ठिकाणी रवाना झाला. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी केली आहे.

महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी माजी खा.इम्तियाज जलील आले, तेव्हा त्यातील एकाने या रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्यांचा ताफा अडविण्याची भाषा केली. त्याच वेळी बागडे यांचा ताफा येऊ लागला. तेव्हा एकाने रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. ताफ्यातील पायलट एस्कॉर्ट गाडीतून सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी खाली उतरत आंदोलकाला रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ताफ्याचा वेग मंदावला होता. तेवढ्यात इतर नागरिक इतर वाहनांसमोर आले. ताफ्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी आले. ते आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच माजी खा.जलील आले. बागडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ताफा रवाना झाला.

पोलिस अधिकाऱ्याने हात जोडले
महिला आंदोलकांनी राज्यपालांच्या वाहनाला घेराव घातला, तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी हात जोडत महिलांना बाजूला होण्याची विनंती केली. त्याच वेळी राज्यपालांच्या सुरक्षेत तैनात असलेले पाेलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्यासह घटनास्थळावरील पोलिस उपनिरीक्षक सचिन वायाळ, पांडुरंग डाके, शिवाजी घोरपडे यांनीही राज्यपालांच्या वाहनाला संरक्षण देत, गाडीच्या समोरील ध्वजाचे रक्षण केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
ही घटना समजताच, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, धनंजय पाटील, सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, गजानन कल्याणकर, सुनीता मिसाळ, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

राजस्थानपर्यंतची सुरक्षा यंत्रणा अलर्ट
‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असतानाही राज्यपालांचा ताफा अडविल्याच्या घटनेमुळे राज्याच्या पोलिस यंत्रणेसह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. पोलिस आयुक्तांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांकडून विचारणा करण्यात येत होती. घटनास्थळावर मोठा फौजफाटा तैनात होता.

...अन् सर्व शांत झाले
घटनास्थळावरून पोलिस आयुक्त मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गेले. राज्यपालांचा ताफा अडविणाऱ्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पोलिस आयुक्तांच्याच मार्गदर्शनात सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या व्हिडीओ फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत होती. जवळपास १५ लोकांची नावे निष्पन्न झाली होती. त्याच वेळी पोलिस आयुक्तांचे राज्यपाल बागडे यांच्यासोबत बोलणे झाले. तेव्हा बागडे म्हणालेे, आंदोलकांच्याही काही भावना आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचे नुकसान केलेले नाही. त्यामुळे कडक कारवाई करू नये. या प्रकारानंतर पोलिस आयुक्त हे राज्यपाल बागडे यांना भेटण्यासाठी रवाना झाले.

असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही
राज्यपाल हे पद घटनात्मक आहे. या पदावरील व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात काही जण राजकारण करीत आहेत. मात्र, कोठे राजकारण करावे, हे समजायला हवे. सुरक्षेच्या बाबतीत असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. संबंधितांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच अतिक्रमण हटाव मोहीम यामुळे थांबणार नाही.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

Web Title: Protesters block Governor Haribhau Bagde's convoy; Rajasthan police on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.