जलवाहिनी टाकलेला पैठण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द; पैठण- शेंद्रा नवीन एक्सप्रेस होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:00 IST2025-12-30T16:59:18+5:302025-12-30T17:00:02+5:30
पैठण ते शेंद्रा हा एक नवीन एक्स्प्रेसलाईनसारखा रोड तयार होणार आहे, त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला.

जलवाहिनी टाकलेला पैठण रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव रद्द; पैठण- शेंद्रा नवीन एक्सप्रेस होणार!
छत्रपती संभाजीनगर : पैठण रोडवर १८ ते २० किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकली आहे. तेवढ्या रस्त्यात बॅरिकेड टाकून रस्ता छोटा करण्यात येणार आहे. जलवाहिनीवरून दुचाकी, चारचाकी वाहने जाणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. जिथे रस्ता अरुंद झाला त्याला विरूद्ध दिशेला भूसंपादन करून रुंदीकरणाचा प्रस्ताव नॅशनल हायवेने तयार केला होता. त्यासाठी ३५० कोटी रुपये भूसंपादनास लागतील, असे शासनाला कळविले होते. मात्र, हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पैठण ते शेंद्रा हा एक नवीन एक्स्प्रेसलाईनसारखा रोड तयार होणार आहे, त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला.
शहराची तहान भागविण्यासाठी पैठण रोडवर २५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनी टाकताना नॅशनल हायवेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला साडेसात मीटरची जागा ठरवून दिली. त्यानुसार जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतर नॅशनल हायवेने रस्ता तयार केला. रस्त्याचे काम झाल्यावर लक्षात आले की, जलवाहिनीवरून वाहतूक चालणार नाही. कारण जलवाहिनी फुटली तर एखादे वाहन किमान १५० फुट उंच आकाशात उडू शकते. या गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी जलवाहिनीच्या बाजूने कायमस्वरूपी लोखंडी बॅरिकेड टाकावेत. रस्ता अरुंद झाला तरी चालेल पण धोकादायक वाहतूक नको. बॅरिकेड उभारण्याची जबाबदारी नॅशनल हायवेवर सोपविण्यात आली. लवकरच नॅशनल हायवेकडून यासंदर्भात कामही सुरू होणार आहे.
‘तो’ प्रस्तावही रद्द, आता एक्स्प्रेसलाइनचीच प्रतीक्षा
तत्पूर्वी नॅशनल हायवेने एक प्रस्ताव तयार केला होता. पैठण रोडवर १८ ते २० किमी अंतरात जलवाहिनीच्या विरुद्ध दिशेला नव्याने भूसंपादन करायचे. जलावाहिनीमुळे जेवढा रस्ता अरुंद होतोय तेवढाच तो पलीकडे रुंद करायचा. यासाठी ३५० कोटी रुपये फक्त भूसंपादनाला लागतील, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मात्र, हा प्रस्ताव रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भविष्यात पैठण ते शेंद्रा हा एक एक्सप्रेसलाईनसारखा स्वतंत्र रस्ता तयार होणार आहे. सध्याच्या पैठण रोडवरील वाहतूक बरीच कमी होईल, त्यामुळे रुंदीकरण होणार नाही.
जलवाहिनीची लवकरच टेस्टिंग
पुढील काही दिवसांत शहरासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीची टेस्टिंग करण्यात येणार आहे. १५ जानेवारीपूर्वी शहरात पाणी येईल, असे राजकीय मंडळी सांगत असले तरी प्रत्यक्षात पाणी येण्यास आणखी काही महिने लागतील हे निश्चित.