मृत प्रा. लोंढेंच्या पैशावर आरोपीची ऐश; १२ लाखांची जग्वार घेतली, आणखी ५० लाखांचं गूढ, पाहा तपासातील नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:42 IST2026-03-23T16:40:28+5:302026-03-23T16:42:19+5:30
तपासात नवे वळण! पिस्तुलवरून आरोपीचा 'यू-टर्न'; पोलिसांची दिशाभूल.

मृत प्रा. लोंढेंच्या पैशावर आरोपीची ऐश; १२ लाखांची जग्वार घेतली, आणखी ५० लाखांचं गूढ, पाहा तपासातील नवे वळण
छत्रपती संभाजीनगर : प्रा. राजाभाऊ लोंढे हत्याकांडातील मुख्य आरोपी विशाल राठोड याने मृत लोंढे यांच्याकडून घेतलेल्या ६५ लाख रुपयांपैकी १२ लाख रुपये खर्च करून जग्वार कार (एमएच १२ एनयू ०३३३) खरेदी केल्याची कबुली दिली. त्यामुळे तपासाला नवे वळण मिळाले आहे. उर्वरित ५० लाखांहून अधिक रकमेचा माग अद्याप लागलेला नाही. या पैशांचा वापर नेमका कशासाठी झाला, याबाबत अद्याप गूढ कायम आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे.
तपासादरम्यान ही कार अपघातग्रस्त झाल्यानंतर कोकणवाडी येथील बॉम्बे ऑटो वर्क्स गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कार जप्त केली आहे. मात्र, उर्वरित रकमेबाबत आरोपीकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने आर्थिक व्यवहारांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले आहे.
दरम्यान, हत्येसाठी वापरलेल्या पिस्टलवरूनही तपासात गोंधळ निर्माण झाला आहे. सुरुवातीला आरोपीने पिस्टल उज्जैन येथून खरेदी केल्याचे सांगत तपास पथकाची दिशाभूल केली. पथक रवाना झाल्यानंतर आरोपीने अचानक जबाब बदलत ‘यू टर्न’ घेतला. अखेर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने पिस्टल खाटूशाम येथून घेतल्याचे सांगितले. त्यामुळे आता पथक खाटूशामला जाण्याच्या तयारीत आहे.
मोबाइल गेमच्या धाग्यानंतर आता पोलिसांनी शस्त्राचा स्रोत, आर्थिक व्यवहार आणि आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात लपवून ठेवलेला मोबाइल हस्तगत करण्यासाठी आरोपींना घेऊन एक पथक लवकरच पुण्याला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ
मुख्य आरोपी विशाल राठोड आणि सहआरोपी करण आढे यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी दोघांची पोलिस कोठडी २५ मार्चपर्यंत वाढवली. सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी उर्वरित रक्कम, पिस्टलचा स्रोत आणि इतर सहकारी यांचा उलगडा करण्यासाठी वाढीव कोठडीची मागणी केली होती. तपास यंत्रणांनी या प्रकरणात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.