प्रा. लोंढे हत्या प्रकरण: 'पैसे परत केले नाहीत तरी पुन्हा ५० लाख का दिले?'; रीलस्टार विशालसह 'त्या' तरुणीची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:57 IST2026-03-18T19:56:42+5:302026-03-18T19:57:14+5:30
लोंढे हत्याकांडात नवा संशय: मारेकरी रिलस्टार्ससह ‘त्या’ तरुणीचे लोंढे यांच्यासोबतचे लाखोंचे व्यवहार बाँड, करारनामा

प्रा. लोंढे हत्या प्रकरण: 'पैसे परत केले नाहीत तरी पुन्हा ५० लाख का दिले?'; रीलस्टार विशालसह 'त्या' तरुणीची चौकशी
छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे (रा. ज्योतीनगर) यांची हत्या करणारा रीलस्टार विशाल राठोड (२४) व अन्य एका रीलस्टार तरुणीचे लोंढे यांच्यासोबत लाखोंचे व्यवहार होते. राठोड व तरुणीने या व्यवहारांचे रीतसर बाँडवर करारनामे केले होते. ते पोलिसांनी हस्तगत केले असून सिनेमे, गाणे काढण्यासाठी हा व्यवहार केल्याचा उल्लेख त्यात होता. मात्र, आरोपींनी पैसे परत केल्याचे पुरावे नाहीत. तरीही लोंढे व विशालचा सातत्याने संपर्क कसा, ते नेहमी बाहेर फिरायला का जात होते, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.
मेहुणा आकाश विनोद पवार (३२, दोघे रा. गेवराई तांडा) याच्यासह मिळून विशाल राठोडने लोंढे यांची ६ फेब्रुवारी रोजी डोक्यात गोळी झाडून हत्या केली. तीस दिवस पोलिसांना गुंगारा देणाऱ्या विशालची एक मैत्रीण व फार्महाऊसवर गेलेल्या एका महिलेच्या जबाबानंतर विशाल व आकाश पुरते अडकले. प्राथमिक तपासात आर्थिक वादासह वैयक्तिक आयुष्यातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा रागही विशालच्या डोक्यात होता. मात्र, त्याव्यतिरिक्त आणखी कुठले कारण आहे का, या दिशेने तपास सुरू आहे. सोमवारी गुन्हे शाखेने विशालच्या रीलस्टार मैत्रिणीला चौकशीसाठी बोलावले होते. तिच्यासह फार्महाऊसवरील दोन महिला व अन्य एका व्यक्तीचा जबाब नोंदवण्यात आला.
या प्रश्नांनी पोलिसही संभ्रमात
-२०२३ मध्ये ओळख झालेल्या विशाल, लोंढे यांच्यात काही दिवसांतच घनिष्ठ मैत्री झाली. ‘लाला’ नावाचा सिनेमा काढायचे वेड लागलेल्या विशालने वर्षभरापूर्वी लोंढे यांच्याकडून ५० लाख रुपये उकळले होते.
-ते परत केलेले नसताना लोंढे यांनी पुन्हा डिसेंबर २०२५ मध्ये त्याला पुन्हा ५० लाख रुपये दिल्याचे समजले. पूर्वीचे पैसे मिळाले नसतानाही लोंढे यांनी पुन्हा विशालला पैसे का दिले?
-पैशांवरून वाद होते तर लोंढे, विशाल सातत्याने का भेटत होते, अनेक ठिकाणी पार्ट्यांना सोबत का जात होते?
-विशालप्रमाणेच रीलस्टार असलेल्या विशालच्याच मैत्रिणीलाही लोंढे यांनी करारनामा करून लाखो रुपये का दिले?
हत्येपूर्वी बिअर, नंतर व्हिस्की
हत्येपूर्वी विशालने थोडी बीअर घेतली. आकाशनेही चार ते पाच पेग दारू घेतली. लोंढे यांना मात्र त्यांनी अंदाजे ७०० एमएलच्या आसपास दारू पाजली. ही बाब उघड होताच विशाल, आकाशने सुरुवातीपासून ते दोघेही दारूच्या नशेत असल्याने फारसे आठवत नसल्याचे केलेले नाटक फोल ठरले. उलटतपासणीत पोलिसांनी हे मुद्दे ठेवताच दोघांची बोबडी वळली.
‘ती’ तरुणी कोट्यवधींच्या घोटाळेबाजांच्या संपर्कात
२०२१ मध्ये बिडकीनमध्ये करोडोंचा घोटाळा उघडकीस आला होता. लोंढे यांच्याकडून लाखो रुपये उकळलेली ‘ती’ तरुणी या घोटाळ्याच्या सूत्रधाराच्या संपर्कात होती, असे सूत्रांनी सांगितले. शिवाय, ती देखील सोशल मीडियावर क्रिएटर असून, मुंबईत अनेक सिनेमे, अल्बम केल्याचे दावे सोशल मीडियावर आहेत. या घोटाळेबाजांच्या कनेक्शनमधली मुलगी लोंढे यांच्या संपर्कात कोणाच्या माध्यमातून आली, याचा शोध पोलिसांनी घेतल्यास मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली.