फावडे, घमेलं पुरवणे भोवले : प्रा. लोंढे यांच्या हत्येत मदत करणाऱ्या ‘त्या’ मित्राच्या कोठडीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 15:50 IST2026-03-20T15:45:03+5:302026-03-20T15:50:01+5:30
आर्थिक व्यवहार असणाऱ्या आणखी चौघांची पोलिस आयुक्तालयात चौकशी

फावडे, घमेलं पुरवणे भोवले : प्रा. लोंढे यांच्या हत्येत मदत करणाऱ्या ‘त्या’ मित्राच्या कोठडीत वाढ
छत्रपती संभाजीनगर : निवृत्त प्राध्यापक राजाराम लोंढे यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह पुरण्यासाठी केवळ मैत्रीपोटी फावडे आणि घमेले घेऊन जाण्यामुळे करण विलास आडे (२२, रा. गिरनेर तांडा) याच्या अडचणीत वाढ झाली. पहिल्या पोलिस कोठडीनंतर आता गुरुवारी पुन्हा तीन दिवसांच्या कोठडीत वाढ होत २२ मार्चपर्यंत त्याला ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.
सध्या पोलिस कोठडीत असलेला लोंढे यांचा मुख्य मारेकरी विशाल विकास राठाेड (२४, रा. गिरनेर तांडा) याच्या घराची बुधवारी तब्बल चार गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या उपस्थितीत पथकाने झाडाझडती घेतली. हत्येनंतर गावात ठेवलेली कार पोलिसांनी जप्त केली शिवाय, पुन्हा घटनास्थळाची पाहणी करुन त्याच्याकडून घटनाक्रम समजून घेतला. विशालला घरी नेताच त्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते. विशाल मात्र तटस्थ होता. गुरुवारीदेखील हत्या करण्याचे अन्य काही कारण आहे का, याबाबत विशालवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. शिवाय, लोंढे यांच्यासोबत आर्थिक व्यवहार असणाऱ्या चौघांची पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली.
मोबाईल फोडण्याबाबत साशंकताच
हत्येपासून लोंढे यांचा मोबाईल अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही. विशाल सुरूवातीपासून त्यांच्या मोबाईलची तोडफोड करून पुण्यातील एका नाल्यात फेकल्याचे सांगत आहे. मात्र, एका त्रयस्थ व्यक्तीकडून मोबाईल लंपास केला गेल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिस अजूनही लोंढे यांचा मोबाईल हस्तगत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आणखी संशयितांची चौकशी होणार
संबंधित गुन्हा संवेदनशील आहे शिवाय, आर्थिक कारणांव्यतिरीक्त हत्येला अन्य कारणांची किनार असल्याचा संशय तपास पथकाला आहे. अटकेत असलेल्या आडेला विशालबाबत इत्यंभूत माहिती आहे शिवाय, हत्येनंतर प्रथम त्यानेच फावडे, घमेल्यासह विशालसाठी दारू आणली होती. त्याच्या दाव्यानुसार, मृतदेह पाहिल्यानंतर तो घाबरून पळणार होता. मात्र, 'ही हत्या तुच केलीये' असे मित्र असलेल्या विशालनेच त्याला धमकावून माती टाकण्यासाठी बळजबरी केल्याचा जबाब त्याने पाेलिसांना दिला. या सर्व अंगाने उलटतपासणी आवश्यक असल्याने पोलिसांनी न्यायालयात त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत २२ मार्चपर्यंत आडेला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आडे मजुरी काम करतो.
कुटुंबाचा जबाब नोंदवणार
आतापर्यंत उस्मानपुरा पोलिसांनी लाेंढे हत्याकांडात १३ जणांचा जबाब नोंदविला आहे. सध्या गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत हे याप्रकरणी तपास करत आहेत. त्यामुळे लोंढे यांच्या हत्येत त्यांच्या कुटुंबाचा जबाब नव्याने नोंदविला जाणार आहे. शुक्रवारी त्यांचा जबाब नोंदविला जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात लोंढे यांच्या आर्थिक व्यवहारासह विशालसोबतचे अनेक बाबींचा नव्याने उलगडा होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
---