पाचोडधील खासगी शाळा, महाविद्यालय ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:04 IST2021-04-09T04:04:16+5:302021-04-09T04:04:16+5:30
पाचोड : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जम्बो कोविड तपासणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातही पॉझिटिव्ह ...

पाचोडधील खासगी शाळा, महाविद्यालय ताब्यात घेणार
पाचोड : ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जम्बो कोविड तपासणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाचोडमधील खासगी शाळा, महाविद्यालय ताब्यात घेणार असून, त्या ठिकाणी उपचार सुरू केले जातील, असे पैठण-फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी स्वप्निल मोरे यांनी सांगितले. पाचोड ग्रामीण रुग्णालयात आढावा बैठकीत ते बोलत होते.
ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पोहरेगावकर व त्यांच्या पथकाने व्यापाऱ्यांची, नागरिकांची जम्बो विशेष कोविड लसीकरण मोहीम सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ३०० जणांनी कोविडची लस टोचून घेतली आहे. गुरुवारी पण दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाचोड गावातील कल्याणनगर, शिवाजीनगर भागात जाऊन नागरिकांना आवाहन केले. दुसऱ्या दिवशीही लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. उपविभागीय अधिकारी मोरे यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षांपासून पुढील सगळ्या नागरिकांचे व महिलांचे लसीकरण केले जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांसाठी खासगी शाळा, कॉलेज ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती
ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर, अधिपरिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामळे कंत्राटी पद्धतीने येथे मनुष्यबळाची भरती केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पोहेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती केली जाईल. यावेळी कृउबा समितीचे सभापती राजू भुमरे, उपसभापती कृष्णा भुमरे, सरपंच शिवराज भुमरे, उपसरपंच शिवाजी भालसिंगे, सुनील मेहेत्रे, राहुल नारळे, डॉ. रोहित जैन, डॉ. इफत सौदागर यांची उपस्थिती होती.