परीक्षेच्या कालावधीमध्ये निष्काळजीपणा झाला तर प्राचार्यांना होणार ५० हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:01 IST2025-05-09T17:01:07+5:302025-05-09T17:01:38+5:30

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून विविध महाविद्यालयांना भेटी देण्याचा सपाटाच लावला आहे.

Principals will be fined Rs 50,000 for negligence during the examination period | परीक्षेच्या कालावधीमध्ये निष्काळजीपणा झाला तर प्राचार्यांना होणार ५० हजार रुपयांचा दंड

परीक्षेच्या कालावधीमध्ये निष्काळजीपणा झाला तर प्राचार्यांना होणार ५० हजार रुपयांचा दंड

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या कालावधीमध्ये प्राचार्यांची अनुपस्थिती, निष्काळजीपणा आणि कॉपी करण्यास प्रोत्साहन देण्यामुळे प्राचार्यांना ५० हजार रुपयांचा, तर सहकेंद्रप्रमुखांना १० हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संदर्भात संबंधितांना नोटीसही पाठविण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे यांनी दिली.

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी मागील काही दिवसांपासून विविध महाविद्यालयांना भेटी देण्याचा सपाटाच लावला आहे. ज्या केंद्रावर कॉपीचा प्रकार आढळून येत आहे, त्या केंद्रावरील विद्यार्थ्यांची संपूर्ण परीक्षाच रद्द केली जात आहे. कुलगुरूंनी मंगळवारी खुलताबाद परिसरातील चिश्तिया, कोहिनूर आणि तलत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाला भेट दिली. बुधवारी जालना येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय, बारवाले महाविद्यालयासह इतर एका महाविद्यालयाला भेट दिली. या भेटीत वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयामध्ये विद्यार्थी राजरोसपणे कॉपी करताना आढळले. त्या संबंधित परीक्षार्थींवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय कुलगुरूंच्या भेटीत अनेक ठिकाणी प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख केंद्रावर आढळून आले नाहीत. त्या केंद्राच्या प्राचार्यास ५० हजार, तर सहकेंद्रप्रमुखास १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. या कारवाईच्या अंमलबजावणीला प्रत्यक्षात सुरुवातही झाल्याचे परीक्षा संचालक डॉ. डोळे यांनी सांगितले.

परीक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणी परीक्षांच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी बैठक व्यवस्था खालच्या मजल्यावर न करता दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावर करण्यात आलेली हाेती. तसेच अनेक ठिकाणी केंद्रप्रमुख, प्राचार्यच गैरहजर होते. त्याशिवाय प्रश्नपत्रिकांच्या छपाईसह इतर प्रकारातही दिरंगाई करण्यात आल्याचेही स्पष्ट झालेले आहे.

Web Title: Principals will be fined Rs 50,000 for negligence during the examination period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.