रजा मंजुरीसाठी मुख्याध्यापकाने शिक्षिकेला मागितले २० हजार, पंटरला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:10 IST2025-09-11T12:06:52+5:302025-09-11T12:10:29+5:30

आयएसओ मान्यता सातारा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Principal asks teacher for Rs 20,000 bribe for sanctioning earned leave, ACB catches punter red-handed | रजा मंजुरीसाठी मुख्याध्यापकाने शिक्षिकेला मागितले २० हजार, पंटरला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

रजा मंजुरीसाठी मुख्याध्यापकाने शिक्षिकेला मागितले २० हजार, पंटरला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

छत्रपती संभाजीनगर : आयएसओ मान्यता असलेल्या सातारा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितली. आपल्या पंटरमार्फत लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी शाळेतच सापळा लावून रंगेहाथ पकडले. यानंतर पथकाने पंटरसह मुख्याध्यापकास ताब्यात घेतले असून, सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

आरोपींमध्ये मुख्याध्यापक सोमनाथ भावले (५२, रा. वसंत विहार, बीड बायपास) आणि गणेश कोथिंबिरे (२६, रा. सातारा गाव) यांचा समावेश आहे. लाच घेणारा गणेश हा शाळेतच मानधनावर संगणक ऑपरेटर म्हणून कामाला असल्याची माहिती ‘एसीबी’च्या पोलिसांनी दिली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडे अर्जित रजेसाठी अर्ज केला होता. रजा मंजुरीसाठी भावलेने कोथिंबिरेच्या माध्यमातून तक्रारादाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार शिक्षिकेने एसीबीकडे बुधवारी तक्रार केली. त्यानुसार पथकाने तत्काळ पंच घेऊन भावलेकडे पडताळणी केली. त्यात रजा मंजुरीसाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदारांनी मुख्याध्यापकाच्या सूचनेनुसार कोथिंबिरेला रक्कम दिली. त्यावेळी पथकाने दोघांना शाळेतच रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून २० हजार रुपयांची लाच रक्कम आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी उपअधीक्षक संगीता एस. पाटील यांच्यासह जमादार सचिन बारसे, अंमलदार राजेंद्र नंदिले, दीपक ईगले, सी. एन. बागूल यांनी केली.

शाळेचा राज्यभरात नावलौकिक
जिल्हा परिषदेच्या सातारा येथील शाळेचा राज्यभरात नावलौकिक आहे. देशातील पहिले आयएसओ प्रमाणपत्र मिळविणाऱ्या जि. प. शाळेचा बहुमानही या शाळेच्या नावावर आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वीच मुख्याध्यापकपदी आलेल्या भावलेच्या गैरकारभारामुळे शाळाच अडचणीत सापडली आहे.

Web Title: Principal asks teacher for Rs 20,000 bribe for sanctioning earned leave, ACB catches punter red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.