छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 11:35 IST2025-05-03T11:28:13+5:302025-05-03T11:35:01+5:30
छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७.२९ कि. मी. रेल्वे मार्गाचे प्रस्तावित दुहेरीकरण हा ब्राऊनफिल्ड विस्तार प्रकल्प आहे.

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाची तयारी
छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७ कि. मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी अखेर भूसंपादनासाठी आवश्यक प्रक्रिया दक्षिण-मध्य रेल्वेकडून सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच छत्रपती संभाजीनगरहून परभणीचा रेल्वे प्रवास दुहेरी रेल्वे मार्गावरून होण्याची आशा आहे.
छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याचा ‘डीपीआर’ गतवर्षी रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर-परभणी या १७७.२९ कि. मी. रेल्वे मार्गाचे प्रस्तावित दुहेरीकरण हा ब्राऊनफिल्ड विस्तार प्रकल्प आहे. विजयवाडा-बल्हारशाह आणि सिकंदराबाद-मुंबई कॉरिडॉरची गर्दी कमी करणे, मालवाहतूक, प्रवासी वाहतुकीसाठी एक कार्यक्षम पर्याय उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांतून जातो. या तिन्ही जिल्ह्यांत भूसंपादन करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया रेल्वेकडून आता सुरू करण्यात आली आहे.
मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेतच वर्षांनुवर्षे निघून गेली. अखेर छत्रपती संभाजीनगर-अंकाई (मनमाड) या ९८ कि. मी. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण मार्गी लागले आणि कामही सुरू आहे. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणालाही गती देण्याची तयारी रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे.
दुहेरीकरणाचा काय फायदा?
मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे जाळे पुरेसे नाही. त्यात बहुतांश एकेरी मार्गच. त्यामुळे रेल्वेंची संख्याही कमी आहे. दुहेरीकरण झाल्यानंतर रेल्वेंची संख्या वाढण्यास मदत होईल. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड-परभणी या एकेरी मार्गाचे विद्युतीकरण मार्गी लागणार आहे.