माहेरी निघालेल्या गर्भवतीची धावत्या रेल्वेतच झाली प्रसूती, प्रवासी महिलांनी केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 19:32 IST2025-05-05T19:32:26+5:302025-05-05T19:32:56+5:30
प्रवासी महिलांच्या मदतीमुळे बाळासह माता सुखरूप

माहेरी निघालेल्या गर्भवतीची धावत्या रेल्वेतच झाली प्रसूती, प्रवासी महिलांनी केली मदत
लासूर स्टेशन : राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकहून नांदेडकडे जात असताना या गाडीतून प्रवास करणाऱ्या एका महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सह प्रवासी महिलांच्या मदतीने ही महिला लासूर स्टेशन दरम्यान शनिवारी रात्री एक वाजता रेल्वेतच प्रसूत झाली असून, तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळासह मातेची प्रकृती ठणठणीत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकहून नांदेडकडे जात होती. या गाडीत एक व्यक्ती आपल्या पत्नीला माहेर असलेल्या सेलू येथे घेऊन जात होता. परंतु, रात्री रोटेगावपासून या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. लासूर स्टेशन परिसरात आल्यानंतर सदर महिला मदतीसाठी आक्रोश करू लागली. त्यानंतर सहप्रवासी महिला गरोदर महिलेच्या मदतीला धावून आल्या. सर्व पुरुष प्रवाशांना इतर डब्यात काढून देत महिलांनी प्रसूतीसाठी मदत केली.
बाळासह माता सुखरूप
अखेर रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ व महिला सुखरूप असून, छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर महिलेला पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयात नेण्यात आले. याकामी रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांच्यासह स्टेशन मास्तर सुनीलकुमार, पोलिस निरीक्षक शरदचंद्र जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक गणेश दळवी, ठाणे अंमलदार वाल्मीक कदम, भाऊसाहेब खिल्लारे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, आकांशा पंडित यांनी मदत केली.