निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू; दहा महिन्यांनंतर डॉक्टरांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:43 IST2025-08-30T19:43:28+5:302025-08-30T19:43:45+5:30
घाटीच्या अहवालात डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा ठपका, सिडको पोलिसांकडून तपास सुरू

निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू; दहा महिन्यांनंतर डॉक्टरांवर गुन्हा, काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर : प्रसूती दरम्यान श्वेता वैभव खरे (२८) या महिलेचा बजरंग चौकातील कुशल मॅटर्निटी रुग्णालयात दि. ३१ ऑक्टाेबर, २०२४ रोजी मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणा व निष्काळजीपणामुळेच झाल्याचा ठपका घाटी रुग्णालयाच्या उच्चस्तरीय समितीने दिला. त्यानंतर डॉ. तपन निर्मल प्रदीप व डॉ. निर्मला आसोलकर यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मेकॅनिकल अभियंता वैभव खरे (रा. विश्रांतीनगर) हे पुण्यात नोकरी करतात. २०२१ मध्ये त्यांचा श्वेतासोबत विवाह झाला होता. २०२४ मध्ये श्वेता गरोदर राहिल्या. आरोपी डॉ. आसोलकर व प्रदीप यांच्याकडे त्यांचे उपचार सुरू होते. ३१ ऑक्टोबर रोजी त्यांना वेदना सुरू झाल्या. रात्री ९ वाजता श्वेता यांनी मुलाला जन्म दिला. जन्माच्या वेळी मुलाचे ओठ व टाळू फुटलेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या जन्मानंतरही श्वेता यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, अवघ्या दहा मिनिटांत त्या बेशुद्ध पडल्या. कुटुंबाने डॉक्टरांना बोलावूनही त्यांनी अपेक्षित उपचार केले नाहीत.
डॉ. तपनने अचानक श्वेता यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, एमजीएममध्ये नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त वैभव यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यावरून घाटीच्या समितीने चौकशी सुरू केली होती. ऑगस्ट, २०२५ मध्ये समितीने डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे श्वेता यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले. त्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी सांगितले.
काय दिलाय निष्कर्ष?
श्वेता यांची रात्री ९.१५ वाजता वाजता फोर्सेपने प्रसुती झाली. महिलेच्या ‘एपिसिओटॉमी वाऊंड’मधून रक्तस्राव होत होता. रुग्णाला ‘ब्लड ट्रान्सफ्युजन’ दिले गेले. परंतु ‘हॅमोरेजिक शॉक’साठी असलेली प्रक्रिया तसेच गर्भाशयाच्या खालच्या भागातील व गर्भाशयमुखाच्या फाटलेल्या ठिकाणावर उपचार करण्यात झाले नाहीत. रुग्णाचा मृत्यू फाटलेल्या भागातील रक्तस्रावामुळे झाला. वेळेत निदान झाले असते आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यांचा मृत्यू टळला असता, असे समितीने म्हटले.