अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देत असतानाच वीज गेली; विद्यार्थ्याचे वर्ष वाया गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 18:28 IST2020-09-05T18:23:29+5:302020-09-05T18:28:44+5:30
विद्यार्थी पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीएस्सी नॉटिकल सायन्सची अंतिम वर्षाची परीक्षा देत होता.

अंतिम वर्षाची ऑनलाईन परीक्षा देत असतानाच वीज गेली; विद्यार्थ्याचे वर्ष वाया गेले
औरंगाबाद : महावितरणने गुरुवारी आॅनलाईन शिकणाऱ्या व परीक्षार्थींना शॉक दिला. देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली सातारा परिसरासह विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करण्याता आला. मात्र, या प्रकारामुळे बीड बायपासवरील छत्रपतीनगरात अंतिम वर्षाची आॅनलाईन परीक्षा देत असताना वीज गेल्याने विद्यार्थी परीक्षेला मुकल्याची घटना घडली.
देवळाई फिडरचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता बंद करण्यात आला. या फिडरवरील आलोकनगर, छत्रपतीनगर, बीड बायपास परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. याच परिसरातील रहिवासी असलेले अरुण गल्हाटे यांचा मुलगा विनीत पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये बीएस्सी नॉटिकल सायन्सची अंतिम वर्षाची परीक्षा देत होता. गुरुवारी शेवटचा नेव्हिगेशनचा आॅनलाईन पेपर सुरू होता. सकाळी दहा ते दुपारी दोन परीक्षेचा कालावधी होता. दहा वाजता आॅनलाईन परीक्षा सुरू झाली. अर्ध्या तासातच लाईट गेली. त्यामुळे पदवीचे वर्ष गमावल्याचा संताप या विद्यार्थ्यासह त्याच्या पालकांनी व्यक्त केला. महावितरणच्या एका चुकीमुळे मुलाचे पदवीचे एका वर्षाचे नुकसान झाले, असे गल्हाटे यांनी सांगितले.
अनेकांना बसला फटका
विविध भागांतील वीजपुरवठा दुपारी चार वाजेपर्यंत बंद होता. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण घेणाऱ्या व देणाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही असाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. विद्यापीठाच्या होणाऱ्या आॅनलाईन परीक्षा आणि क्लासेस यांच्या नियोजनात महावितरणशी समन्वय साधण्याची गरज असल्याचेही पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून नियोजन गरजेचे
सध्या विविध शहरांत शिक्षण घेणारे, वर्क फ्रॉम होम काम करणारे नोकरदार शहरात आले आहेत. आता परीक्षांचा काळ सुरू आहे. बहुतांश लोकांचे आॅनलाईन क्लासेससह कामे चालतात. त्यामुळे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून वीजपुरवठ्याचे नियोजन गरजेचे आहे. कार्यालयीन वेळेत वीजपुरवठा सुरळीत मिळणे, तसेच विद्यापीठ, शिक्षण विभागाशी महावितरणचा समन्वय गरजेचा आहे.
-अरुण गल्हाटे, परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्याचे पालक
पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्ती
पूर्वनियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्याविषयी ग्राहकांना मेसेज आणि जाहिरातीद्वारे माहिती दिली गेली आहे. देवळाई फिडरचा पुरवठा बंद होता. आलोकनगर, छत्रपतीनगर, आयप्पा मंदिर परिसर, रेणुकामाता मंदिर परिसर, म्हस्के पेट्रोल पंप परिसरातील वीजपुरवठा बंद होता.
-अविनाश चव्हाण, सहायक अभियंता, सातारा शाखा, महावितरण