पॉवर ऑफ सायलेन्स! छत्रपती संभाजीनगरात जप्त सायलेन्सरमधून पोलिसांनी उभारले 'स्पेस रॉकेट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:13 IST2025-04-23T19:04:18+5:302025-04-23T19:13:51+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या अभिनव उपक्रमातून ‘स्पेस रॉकेट’चं अनावरण

पॉवर ऑफ सायलेन्स! छत्रपती संभाजीनगरात जप्त सायलेन्सरमधून पोलिसांनी उभारले 'स्पेस रॉकेट'!
छत्रपती संभाजीनगर: शहरातील युवकांमध्ये गोंगाट निर्माण करणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकींच्या सायलेन्सरवर पोलिसांनी कारवाई करत एक अभिनव उपक्रम राबविला आहे. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच महिन्यांत सुमारे ३०० सायलेन्सर जप्त करण्यात आले होते. या जप्त सायलेन्सरचा पुनर्वापर करत आकर्षक आणि कलात्मक ‘स्पेस रॉकेट’ तयार करण्यात आलं आहे.
नुकतेच क्रांती चौकातील सौंदर्य बेटावर या स्पेस रॉकेटचे लोकार्पण पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मनपा प्रशासक जी. श्रीकांत, उपायुक्त बगाटे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक विकास जैन आणि उद्योजक सुनील किर्दक आदी मान्यवर उपस्थित होते.
उपायुक्त नितीन बगाटे यांनी यावेळी सांगितले की, "साउंड पोल्युशनमुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे ही मोहिम हाती घेण्यात आली. जप्त सायलेन्सर केवळ स्क्रॅपमध्ये न टाकता, त्यांचा पुनर्वापर करून जनजागृती करण्याचा आमचा उद्देश होता."
जप्त सायलेन्सरचा पुनर्वापर करत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आकर्षक आणि कलात्मक ‘स्पेस रॉकेट’ तयार आलं असून यातून जनजागृती साधली आहे. #chhatrapatisambhajinagar#marathwadapic.twitter.com/z4wEXfoft1
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) April 23, 2025
हे स्पेस रॉकेट उद्योजक सुनील किर्दक यांच्या कंपनीत तयार करण्यात आले असून, त्याचा उपयोग नागरिकांमध्ये साउंड पोल्युशनविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. या अभिनव उपक्रमामुळे पोलिस प्रशासनाच्या जनसंपर्कात वाढ झाली असून, युवकांमध्येही याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.