युनिपोलवर राजरोस राजकीय जाहिराती; मनपा, स्मार्ट सिटीच्या एजन्सींकडून कराराचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:30 IST2025-06-05T14:26:15+5:302025-06-05T14:30:02+5:30
राजकीय, धार्मिक आणि तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती लावू नयेत, असे करारात नमूद असतानाही त्या लावल्या जात आहेत.

युनिपोलवर राजरोस राजकीय जाहिराती; मनपा, स्मार्ट सिटीच्या एजन्सींकडून कराराचा भंग
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी दुभाजकात मोठमोठ्या युनिपोल उभारणीची क्रेझ अलीकडे बरीच वाढली आहे. महापालिका आणि स्मार्ट सिटीने विविध खासगी एजन्सींना पोल उभारणी, जाहिरातींचे काम दिले. पण, या एजन्सींकडून कराराचा भंग होत असल्याचे दिसत आहे.
राजकीय, धार्मिक आणि तेढ निर्माण करणाऱ्या जाहिराती लावू नयेत, असे करारात नमूद असतानाही त्या लावल्या जात आहेत. स्मार्ट सिटीने महापालिकेला विश्वासात न घेता एका खासगी एजन्सीला १५२ ठिकाणी युनिपोल उभारणीचे काम दिले. एजन्सीने आतापर्यंत ११०पेक्षा अधिक युनिपोल उभारले. महापालिकेच्या मालमत्ता विभागाने मागील सात वर्षांमध्ये जवळपास ३०० युनिपोल उभारणीची परवानगी दिली. त्यातील जवळपास २००पेक्षा अधिक ठिकाणी युनिपोल उभे आहेत. युनिपोलवर व्यावसायिक जाहिराती असाव्यात, असे निकष आहेत. करारात राजकीय, धार्मिक, दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पद्धतीच्या जाहिराती लावू नयेत, असे स्पष्टपणे नमूद आहे. त्यानंतरही मागील काही दिवसांपासून राजकीय जाहिरातबाजी सुरू आहे. राजकीय जाहिरातींसाठी महापालिकेचे अधिकृत १५०पेक्षा अधिक होर्डिंग आहेत.
अनधिकृत जाहिरातींवर बंदी
महापालिकेने अलीकडेच अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. काही राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. अनधिकृत होर्डिंगची छपाई करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या जातील, असा इशारा दिला. त्यामुळे छपाई करणाऱ्यांनी राजकीय होर्डिंग तयार करून देण्यास नकार दिला. त्यामुळे राजकीय नेत्यांनी आता युनिपाेलकडे मोर्चा वळविला आहे.
परस्पर जाहिराती लावतात
आमच्या युनिपोलवर काही कार्यकर्ते आणि इतर मंडळी परस्पर होर्डिंग लावून मोकळे होतात. आम्हाला कल्पनाही नसते. मनपाकडून जेव्हा याबाबत विचारणा होते, तेव्हा उत्तर देता येत नाही.
-नीलेश क्षत्रिय, प्रो ॲक्टिव्ह एजन्सी