पोलिसांची सुरक्षाच धोक्यात; ठाण्यात ३ वर्षांपासून पडून हाेते जप्तीतले २६ गॅस सिलिंडर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:11 IST2025-01-25T18:10:22+5:302025-01-25T18:11:04+5:30
नवनियुक्त निरीक्षकांच्या स्वच्छता मोहिमेत समोर आला धक्कादायक प्रकार

पोलिसांची सुरक्षाच धोक्यात; ठाण्यात ३ वर्षांपासून पडून हाेते जप्तीतले २६ गॅस सिलिंडर
छत्रपती संभाजीनगर : कारवाईत जप्त केलेले २६ गॅस सिलिंडर जिन्सी पाेलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात धोकादायकरीत्या पडून होते. निरीक्षक अविनाश आघाव यांना हा प्रकार निदर्शनास येताच सर्व सिलिंडरची कायदेशीररीत्या निर्गती करण्यात आली. मात्र, दाट वस्तीत असलेल्या ठाण्यात हा सिलिंडरचा धोकादायक साठा यापूर्वी एकाही अधिकाऱ्याच्या लक्षात कसा आला नाही, हा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्याभरापूर्वी शासकीय विभागांना सात कलमी कार्यक्रम आखून देत १०० दिवसांची मुदत दिली आहे. पोलिस ठाण्यांची स्वच्छता, तक्रारदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व बसण्यासाठी आसनव्यवस्था, प्रलंबित सर्व अर्ज महिन्याभरात निकाली काढणे, वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या मुद्देमालाची निर्गती करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने गेल्या पाच दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसह सर्व ठाण्यांमधून ‘रद्दी’ बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली आहे.
कोणाच्या लक्षात कसे आले नाही ?
जिन्सी ठाण्याच्या चहुबाजूंनी दाट रहिवासी वस्ती आहे. तीन वर्षांपूर्वी एका कारवाईत जप्त २६ घरगुती वापराचे सिलिंडर ठाण्यात तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे हा सिलिंडर बॉम्ब सोबतच ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी काम करत होते. नुकताच ठाण्याचा तात्पुरता पदभार मिळालेल्या आघाव यांच्या हा प्रकार निदर्शनास पडला. त्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याची कायदेशीररीत्या निर्गती केली.
एक दगड आयुष्य जखमी करतो...
- स्वत:ची जागा असलेल्या जिन्सी ठाण्यात गंजलेली वाहने, भंगाराने भरले होते. आता ते सर्व काढून स्वच्छ करण्यात आले. त्या जागी आता व्हॉलिबॉल खेळण्यासाठी जागा करण्यात येत असून, ओपन जिम केले जाणार आहे.
- शिवाय, संवेदनशील ठाण्याच्या भिंतीवर तरुणांसाठी मार्गदर्शक पोस्टर लावण्यात आले आहेत. यात ‘एक दगड आयुष्य जखमी करतो’, असे सांगत एका चुकीमुळे आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणारी विविध पोस्टर्स लावण्यात आले आहेत.