औरंगाबादमध्ये पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 12:46 IST2018-10-12T12:44:03+5:302018-10-12T12:46:24+5:30
पोलिसांनी ताब्यात घेतलेला चोर एसआरपीएफचा जवान असल्याचा धक्कादायक उलगडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये पोलिसच निघाला मंगळसूत्र चोर
औरंगाबाद : सातारा परिसरात मंगळसुत्र चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला चोर एसआरपीएफचा जवान असल्याचा धक्कादायक उलगडा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. योगेश सुरेश शिनगारे असे आरोपी पोलिसाचे नाव असून सातारा पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सातारा परिसरात राहणाऱ्या सुरेखा राजेंद्र ठाले या मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोराने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी त्याच दिवशी त्यांनी सातारा परिसरात गुन्हा दाखल केला.
परिसरात वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे आणि पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. चव्हाण यांनी या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरु केला. दरम्यान, आज पहाटे तपासातील काही धाग्याच्या आधारे त्यांनी योगेश सुरेश शिनगारे याला ताब्यात घेतले. शिनगारे याची अधिक चौकशी केली असता त्याने ठाले यांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली.
पोलिसच निघाला चोर
धक्कादायक बाब म्हणजे योगेश शिनगारे हा राज्य राखीव दलातील कॉन्स्टेबल आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शिनगारे हा कर्जबाजारी असून त्याला दारूचे व्यसन आहे. सातारा परिसरात जानेवारी पासून झालेल्या १० ते १२ मंगळसूत्र चोरीच्या घटनांच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे.