मौजमजेसाठी ऑर्डरनुसार दुचाकी चोरणारा साथीदारासह अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 18:04 IST2019-08-12T18:04:27+5:302019-08-12T18:04:59+5:30
पोलिसांनी त्यांच्याकडून १७ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

मौजमजेसाठी ऑर्डरनुसार दुचाकी चोरणारा साथीदारासह अटकेत
औरंगाबाद: मौजमजेसाठी मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्यासह खरेदीदारालाही पुंडलिकनगर पोलिसांनीअटक केली. आरोपींनी २७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. यापैकी १७ मोटारसायकली पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत. औरंगाबाद शहरासह वैजापुर, कन्नड,गंगापुर, श्रीरामपुर आणि नाशिक जिल्ह्यातील येवला आदी ठिकाणाहून या मोटारसायकली चोरल्या आहेत.
मनोज संतोष आराध्ये (वय २२,रा. सोनारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) आणि शेख गणी शेख सुभान(३५,रा. परसोडा, ता. वैजापुर)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध वसाहतीमधून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. ही बाब समजताच पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी वाहन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे हे गस्तीवर असताना त्यांना माहिती मिळाली की, शहराच्या विविध भागाातून मनोज आराध्ये याने दुचाकी चोरी केली असल्याची माहिती खबऱ्याने दिली.
शिवाय परसोडा येथील शेख गणी कोणत्याही कंपनीची मोटारसायकल अत्यल्प किंमतीत उपलब्ध करतो, असे समजले. यानंतर सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी रमेश सांगळे, मच्छिंद्र सोनवणे,बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ,नितेश जाधव, दीपक जाधव, एसपीओ शिवाजी बुट्टे,स्वप्नील विटेकर, संतोष बोधक, कैलास मते,श्रीमंत गोर्डे पाटील यांच्या पथकाने त्यांचा शोध घेऊन लासूर स्टेशन येथे मनोज आणि गणीला दुचाकीसह ताब्यात घेऊन आणले. त्यांच्याजवळी मोटारसायकलीविषयी कसून चौकशी केली असता मौजमजेसाठी मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. शिवाय औरंगाबाद शहरासह वैजापुर, कन्नड,गंगापुर, श्रीरामपुर आणि नाशिक जिल्ह्यातील येवला आदी ठिकाणाहून मागणीनुसार मोटारसायकल चोरी करीत असल्याचे सांगितले.