अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 00:21 IST2025-04-27T00:21:17+5:302025-04-27T00:21:48+5:30

लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे...

Poisoning from wedding food in Ambala village; Eight-year-old child dies, condition of many critical | अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील अंबाला गावात ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा शुक्रवार, २५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, लग्नाच्या जेवणातून विषबाधा होऊन सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना त्रास झाला असून, यामध्ये एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे.

सुरेश गुलाब मधे (वय ८, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) या चिमुकल्याचा विषबाधेमुळे मृत्यू झाला. तर, संगीता मेंगाळ (वय २५, रा. अंबाला) या महिलेची प्रकृती गंभीर असून, त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाला गावातील आठ मुलींचा सामूहिक विवाह शुक्रवार दुपारी ४.३० वाजता संपन्न झाला. विवाहानंतर सायंकाळी ५ वाजता जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. अंबाला गावासह कळंकी, महादेवखोरा, तांदुळवाडी, घुसुर, निमडोंगरी, शिपघाट, कोळवाडी, खोलापूर, धामडोह तसेच निरगुडी पिंपरी (ता. खुलताबाद), नांदगाव (जि. नाशिक), चाळीसगाव (जि. जळगाव) येथून आलेल्या ३२ ठाकरवाड्यांतील पाहुण्यांनी जेवण घेतले होते.

आज दुपारपासून दिसली लक्षणे.....
शनिवारी, २६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विषबाधेचे लक्षणे दिसू लागली. अनेकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी व तापाची लक्षणे जाणवली. काहींना स्थानिक खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास सर्व रुग्णांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी रुग्णालयाला भेट दिली. कन्नड ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड, डॉ. प्रवीण पवार आणि सर्व वैद्यकीय पथक परिस्थिती हाताळण्यासाठी तत्पर झाले आहे.

या घटनेमुळे अंबाला गावात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे. विषबाधेचे नेमके कारण आणि दोषी व्यक्तींची चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

Web Title: Poisoning from wedding food in Ambala village; Eight-year-old child dies, condition of many critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.