'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:21 IST2025-07-25T12:20:21+5:302025-07-25T12:21:45+5:30
ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, जातीवाचक शिवीगाळ करून केले अपमानित

'PI'च्या भावाचा व्यावसायिकाच्या कुटुंबावर हल्ला, पायावर नाक घासून माफी मागायला लावली
छत्रपती संभाजीनगर : ट्युशनमधील मुलींच्या वादातून पोलिस निरीक्षकाच्या भावाने गुंडांच्या मदतीने दुसऱ्या मुलीच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. काठ्या, लाठ्यांनी हल्ला करत पती-पत्नीला जखमी केले. मुलीच्या आईचे केस पकडून पायावर नाक घासून माफी मागायला लावण्यापर्यंत हल्लेखोरांनी मजल मारली. २२ जुलै रोजी साताऱ्यात घडलेल्या घटनेप्रकरणी संदीप लंके, त्याची पत्नी व अन्य दोन हल्लेखोरांवर सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संदीप लंके एका पोलिस निरीक्षकाचा भाऊ असून, त्यांच्या नावे धमकी देत त्याने हे टोक गाठले.
साताऱ्यात राहणाऱ्या ४५ वर्षीय तक्रारदाराचा नागेश्वरवाडीत गेम झोनचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी कृतिका (नाव बदलले आहे) व लंकेची मुलगी एकाच ट्यूशनमध्ये शिकतात. काही दिवसांपूर्वी कृतिका व लंकेच्या मुलीत वाद झाले. शिक्षकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र, लंकेच्या मुलीला कृतिकाची माफी मागायला लावल्याच्या कारणावरून संदीपने कृतिकाच्या वडिलांच्या दुकानावर जात कृतिकाला मारण्याची धमकी दिली. तक्रारदाराने समजूत घालून वाद मिटवण्याची विनंती केली. २२ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता लंके दाम्पत्याने अचानक दोन गुंडांसह लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांसह त्यांचे घर गाठत हल्ला चढवला. लंकेंच्या पत्नीने कृतिकाच्या आईचे केस पकडून ठेवले, तर अन्य तिघांनी कृतिकाच्या वडिलांना घराबाहेर नेले.
संपूर्ण शरीरावर गंभीर वार
सर्वांनी मिळून कृतिकाच्या वडिलांच्या संपूर्ण शरीरावर गंभीर वार केले. दोघे त्यांना विनवण्या करत होते. हा आरडाओरडा पाहून शेजाऱ्यांनी धाव घेत कृतिकाच्या आईची सुटका केली. घटनेची माहिती कळताच सातारा पोलिसांनी धाव घेतली. लंकेने पोलिस अधिकारी असलेल्या भावाच्या नावाने पोलिसांनाही धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पायावर नाक घासायला लावले
कृतिकाच्या वडिलांना घराबाहेर काढल्यानंतर आईला घरात लाथाबुक्क्याने मारहाण केली. केस धरून लंके यांच्या पत्नीच्या पायावर नाक घासून माफी मागायला लावली. जातीवाचक शिवीगाळ करत अपमानित केले. याप्रकरणी हल्लेखोरांवर बीएनएस ३३३ (दुखापत, हल्ला करून घरावर अतिक्रमण), ११८-२ (घातक हत्यारांनी हल्ला), ७४ (विनयभंग), ३०९-६ (जबरी चोरी) सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. रणजीत पाटील अधिक तपास करत आहेत.