तीर्थक्षेत्र विकास रखडला !
By Admin | Updated: July 29, 2014 01:08 IST2014-07-29T00:27:09+5:302014-07-29T01:08:43+5:30
लातूर : राज्य शासनाकडून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी जि.प. ला ८ कोटींचा निधी मिळाला आहे.

तीर्थक्षेत्र विकास रखडला !
लातूर : राज्य शासनाकडून जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासासाठी जि.प. ला ८ कोटींचा निधी मिळाला आहे. या तुटपुंज्या निधीवर श्री सिद्धेश्वर, श्री रत्नेश्वर यात्री निवास, हजरत पीरपाशा दर्गा, संजीवनी बेट आणि खरोसा लेण्यांचा विकास करण्यात आला. तोही अपुराच. आता तीर्थक्षेत्र विकासासाठी आणखी दीडशे कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे कामे रखडली आहेत.
८ कोटींच्या निधीतून श्री सिध्देश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानचे यात्री निवास या कामासाठी ३९९ लाखांचा निधी खर्च करण्यात आला. निलंगा येथील हजरत पीर पाशा दर्गाच्या विकासासाठी १७० लाख रूपये खर्च करून दर्ग्याचे काम करण्यात आले़ चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटाच्या विकासासाठी ७५ लाखांचा निधी शासनाकडून आला असल्याने तेथील विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे़ औसा तालुक्यातील खरोसा लेण्याच्या विकासासाठी २० लाखाचा निधी मिळाला असून त्यातून लेण्यातील विकास कामे सुरू केली आहेत. शासनाकडून आलेल्या ८ कोटी १७ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामांसाठी निधीची गरज आहे. तसा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने १५० कोटींचा तीर्थक्षेत्र विकासाचा कृती आराखडा तयार करून शासनाला सादर केला आहे.
साडेपंधरा कोटींची कामे प्रस्तावित...
२०१४-१५ मध्ये रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चैत्य स्मारकासाठी ७१० लाख, लातूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानासाठी ७९१ लाख, बालाजी मंदिर विकासासाठी ३० लाख, पापविनाश मंदिर विकासासाठी ७८़५० लाख, नागनाथ मंदिरासाठी २७०़५० लाख, साईबाबा मंदिरासाठी २८़५० लाख, गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासाठी ६१़८० लाख रूपयांचा खर्च लागणार आहे़ जिल्हाभरात साडे पंधरा कोटींची कामे प्रस्तावित असल्याची माहिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अभिजीत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़