मनपाचा कांचनवाडी येथील पेट्रोल पंप तयार, फक्त एक परवानगी बाकी; लवकरच लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 20:05 IST2024-08-12T20:05:05+5:302024-08-12T20:05:22+5:30
कांचनवाडी पेट्रोल पंप ऑगस्ट अखेर सुरू होणार अशी माहिती

मनपाचा कांचनवाडी येथील पेट्रोल पंप तयार, फक्त एक परवानगी बाकी; लवकरच लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासनाने कांचनवाडी येथे दुसरा पेट्रोल पंप तयार केला. पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचा पुरवठाही करण्यात आला. पेट्रोल पंप चालविण्यासाठी दिव्यांग बांधवांची निवडही करण्यात आली. आता फक्त नॅशनल हायवेकडून अंतिम परवानगी मिळविण्याचे काम सुरू आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पेट्रोल पंप सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेने सर्वप्रथम मध्यवर्ती जकात नाका येथे पहिला पेट्रोल पंप सुरू केला. या पंपाला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पेट्रोल-डिझेलची विक्री मोठ्या प्रमाणात हाेत आहे. दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाला मिळत आहे. त्यामुळे शहरात आणखी चार ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. कांचनवाडी येथील मनपाच्या जागेवर दुसरा पंप सुरू करण्याचा निर्णय मागील वर्षी झाला. त्यासाठी पेट्रोलियम कंपनीला जागा उपलब्ध करून दिली. काही महिन्यात कंपनीने पंप उभा केला. तांत्रिक अडचणींमुळे सहा ते आठ महिन्यांपासून पेट्रोल पंप सुरू होण्यास विलंब होत आहे. विविध अडथळे दूर झाल्यानंतर लवकरच पंप सुरू करण्यात येणार आहे. नॅशनल हायवेकडून एक अंतिम एनओसी मिळणे बाकी आहे. ही एनओसी मिळाल्यावर लोकार्पण सोहळा आयोजित केला जाणार असल्याचे मनपातील सूत्रांनी सांगितले.
दिव्यांग बांधवांची निवड
पेट्रोल पंपावर कामासाठी दिव्यांग कर्मचारी ठेवण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. त्यानुसार मुलाखती घेऊन दहा जणांची निवड केली. या शिवाय काही सर्वसामान्य कर्मचारीही शिफ्टनुसार या ठिकाणी काम करतील. तिसरा पेट्रोल पंप शहानूरमियाँ दर्गा परिसरात सुरू केला जाणार आहे. त्यासाठी मालमत्ता विभागाकडून प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
- अमोल कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, मनपा.