वैजापूर : केंद्र सरकारच्या उच्चदाब वीज वितरण योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थेट बांधावर कृषी पंपाला वीज जोडणी दिली जाते. मात्र, महावितरणकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप तालुक्यातील अंचलगाव येथील शेतकऱ्यांनी केला आहे.
वैजापूरच्या महावितरण कंपनी कार्यालय दोनअंतर्गत अंचलगावाचा समावेश होतो. येथील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणी करून देण्यासाठी ज्या कंत्राटदाराने काम घेतले आहे. त्याने फक्त रोहित्राचा ओटा तयार केला, तर पुढील कामे खोळंबली असून, जाणूनबुजून या कामात चालढकल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात वीज जोडणी कधी होईल, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
अंचलगाव येथील सात शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केला. आठ महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी पैशाचा भरणा केला. आठ महिन्यांपूर्वी ठेकेदाराकडून रोहित्र बसविण्यासाठी सांगाडा उभारला गेला. त्यानंतर अद्यापही वीज जोडणीचे काम पूर्ण झालेच नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष केले आहे.
बाराशे ठिकाणी रोहित्र बसविण्याचे काम सुरू
वैजापूर महावितरणच्या दोन्ही उपविभागांत जवळपास १,४०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १,२०० ठिकाणी रोहित्र बसवण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती महावितरण कंपनीतील सूत्रांनी दिली. वीज जोडणीत १६ के.व्ही. क्षमतेची सिंगल डीपी महावितरण कंपनीकडून बसविली जाते. त्यामुळे अतिरिक्त भार, कमी दाबाने प्रवाह, तसेच वीजचोरी अशा प्रकाराला आळा बसून शेतकऱ्याला मागणीनुसार वीजपुरवठा केला जातो.