'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:11 IST2025-10-06T16:10:09+5:302025-10-06T16:11:04+5:30
भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक; अजित पवारांच्या विरोधात कट; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

'पवारांनी आमचं वाटोळं केलं, तर ओबीसी नेत्यांनीच ओबीसींना संपवलं'; जरांगेंचा थेट हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. काँग्रेसचे नेते आणि ओबीसी प्रतिनिधी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाला विरोध दर्शवताना केलेल्या '३७४ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवावे' या वादग्रस्त वक्तव्यावर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. जरांगे यांनी थेट शरद पवार यांच्यापासून छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यावर हल्ला चढवत, 'ओबीसी समाजाचा खरा घात ओबीसी नेत्यांनीच केला आहे,' असा गंभीर आरोप केला आहे.
वडेट्टीवारांवर सडेतोड पलटवार
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, "ओबीसीच्या ३७४ जाती नेमक्या कोणी संपवल्या, यावर ओबीसी समाजाने चिंतन करायला हवे. ओबीसींचा घात हा येवल्याच्या अलिबाबाने (भुजबळ) आणि आता वडेट्टीवार आणि पूर्वीचे नेते यांनी केला आहे." वडेट्टीवार यांचा 'सत्तेची दादागिरी' हा आरोप फेटाळताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, मराठा आरक्षणाची प्रत्येक मागणी हैदराबाद गॅझेट आणि नियमांच्या आधारावर केलेली आहे.
'शरद पवारांनी आमचं वाटोळं केलंच'
यावेळी मनोज जरांगे यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही थेट टीका केली. १९९४ साली मराठ्यांचे हक्काचे १६ टक्के आरक्षण ओबीसींना देण्यात आले, त्यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले. "ज्यांनी १९९४ ला १६ टक्के आरक्षण आम्हाला दिले, उदाहरणार्थ शरद पवारांनी... त्यांनी आमचं वाटोळं केलंच समजा. पण त्याच पवारांनी यांचेही (ओबीसी नेते) उपकार ठेवले नाहीत, याचा अर्थ ओबीसीची खरी फसवणूक ओबीसीच्या नेत्यानेच केली आहे," असे जरांगे म्हणाले.
भुजबळ आणि वडेट्टीवारांवर 'षडयंत्रा'चा आरोप
जरांगे यांनी छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे एकत्र येऊन राजकारण करत असल्याचा आणि जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला. भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावे, यासाठी वडेट्टीवार यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याचा दावाही त्यांनी केला. याचबरोबर, जरांगे यांनी अजित पवार यांच्यावरही मोठे षडयंत्र सुरू असल्याचा दावा केला. "हा (भुजबळ) माणूस जातीयवादाच्या दंगली लावू शकतो. शिवसेना प्रमुख, अजित पवार यांच्या डोक्यात झोपेत दगड घातला. हे त्यांना (शिंदे-अजित पवार-फडणवीस यांना) संपवतील," असा इशारा जरांगे यांनी दिला.
शेतकऱ्यांसाठी टोकाचा लढा आणि काँग्रेसवर टीका
हैदराबाद गॅझेटचा जीआर नियमानुसार निघाला असून तो रद्द होऊ शकत नाही, त्यामुळे मराठा बांधवांनी प्रमाणपत्रासाठी तयारी करावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच, त्यांनी काँग्रेससारख्या पक्षांना मराठ्यांनी मोठे करू नये, असे आवाहन करत दिवाळीपर्यंत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत न मिळाल्यास मराठा आरक्षणासारखाच 'टोकाचा अंतिम लढा' उभा करण्याचा इशाराही राज्य सरकारला दिला.