PSI पूर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलीचे आगमन; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करताना मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 20:22 IST2024-10-15T20:21:42+5:302024-10-15T20:22:21+5:30
छातीवर स्पर्धा परीक्षेचे पुस्तक अन् पोलीस अंमलदाराचा हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; आदल्या दिवशीच दिली होती मुख्य परीक्षेची मॉक टेस्ट;

PSI पूर्वपरीक्षा उत्तीर्ण अन् मुलीचे आगमन; दुहेरी आनंदातील अंमलदाराचा अभ्यास करताना मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : शहर सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार रमेश शेषराव भिसे (३३, ए, रा. राजेशनगर, बीड बायपास) यांचा सोमवारी पहाटे झोपेतच हृदयविकाराने मृत्यू झाला.
१३ ऑगस्ट २०१४ रोजी पोलिस दलात भरती झालेले भिसे यांचे उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होते. सप्टेंबर महिन्यात पूर्व परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. डिसेंबर मध्ये नियोजित मुख्य परीक्षेसाठी मैदानी चाचणीची तयारी करत होते. रविवारी त्यांनी मॉक टेस्ट दिली. रात्री कुटुंबासह जेवण करून अभ्यासासाठी खोलीत गेले. रोज पहाटे मैदानी सरावासाठी उठणारे रमेश लवकर न उठल्याने त्यांना भाऊ उठवण्यासाठी गेला. मात्र, प्रतिसाद देत नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पुस्तक वाचत असतानाच झोप लागलेल्या रमेश यांच्या छातीवर उपनिरीक्षकाच्या परीक्षेचे पुस्तक तसेच होते.
सात दिवसांपूर्वी मुलगी झाली
रमेश यांचे मोठे भाऊ सध्या एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अंमलदार आहेत. मोठी मुलगी चार वर्षांची असून सात दिवसांपूर्वीच त्यांना दुसरी मुलगी झाली. त्यामुळे ते आनंदात होते. त्यांच्या निधनाने शहर पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पैठण तालुक्यातील मूळ गाव रजापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.