प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:43 IST2025-06-12T12:41:48+5:302025-06-12T12:43:39+5:30

शहरावर घिरट्या घालून विमान नाशिककडे रवाना

Passengers tremble! Severe storm... IndiGo plane sways in the air at Chhatrapati Sambhajinagar | प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे

प्रवाशांचा थरकाप! भीषण वादळ...छत्रपती संभाजीनगरात इंडिगो विमानाचे हवेत हेलकावे

छत्रपती संभाजीनगर : शहरात बुधवारी सायंकाळी सुटलेल्या वादळात इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगरविमान सापडले. वादळात विमानाने कधी डाव्या, तर कधी उजव्या बाजूने हेलकावे घेतले. या प्रकाराने प्रवाशांमध्ये हलकल्लोळ उडाला. वादळामुळे विमान चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर उतरू शकले नाही. अखेर ते नाशिककडे वळवावे लागले.

इंडिगोचे दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमान हे दररोज सायंकाळी ६:२५ वाजता शहरात दाखल होते. सायंकाळी ६:५५ वाजता पुन्हा दिल्लीसाठी रवाना होते. हे विमान बुधवारी नियमित वेळेप्रमाणे सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास शहराच्या हवाई क्षेत्रात दाखल झाले. परंतु, त्याच वेळी शहरात वादळ सुटले होते. अशा परिस्थितीत विमान कधी एका बाजूला, तर कधी दुसऱ्या बाजूने हेलकावे घेत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानाला लँडिंगसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे वैमानिकाने विमान नाशिकला वळविण्याचा निर्णय घेतला. हे विमान नाशिकला रवाना झाले. हे विमान रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा शहरात दाखल झाले. मोठ्या अपघातातून बचावल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. या घटनेमुळे दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना उशिरापर्यंत विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली. याविषयी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

३० प्रवासी परत विमानात बसलेच नाहीत
हे विमान नाशिकला गेल्यानंतर ३० ते ३५ प्रवासी तेथेच उतरून गेले. या विमानाने पुन्हा छत्रपती संभाजीनगरला येण्यास त्यांनी नकार दिल्याचे सांगण्यात आले.

जीव मुठीत घेऊन बसलो
वादळात विमान कधी एका बाजूने, तर कधी दुसऱ्या बाजूने झुकत होते. आम्ही जीव मुठीत घेऊनच बसलो होतो. खूप थरारक अनुभव आला. अखेर सुखरूपपणे आलो. आम्ही पायलटचे आभार मानले.
- गीता आचार्य, विमान प्रवासी

Web Title: Passengers tremble! Severe storm... IndiGo plane sways in the air at Chhatrapati Sambhajinagar