रस्त्यावर कार उभी करून जेवणास गेला; ग्राहकासह हॉटेलमालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:09 IST2025-12-30T15:08:12+5:302025-12-30T15:09:02+5:30
वाहतूक कोंडीमुळे सिटी चौक पोलिसांची कठाेर कारवाई, दोन महिन्यांत १७ गुन्हे दाखल

रस्त्यावर कार उभी करून जेवणास गेला; ग्राहकासह हॉटेलमालकावर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : दुकान, हॉटेलमध्ये जाताना रस्त्यावरच गाड्या उभ्या करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ग्राहकांसोबतच आता दुकानमालक व हॉटेलचालकांवरही गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सततच्या वाहतूक कोंडीमुळे सिटी चौक पोलिसांनी ही कठोर भूमिका घेतली आहे. १ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर यादरम्यान १७ कारवायांमध्ये ३० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
सिटी चौक, गुलमंडी, महानगरपालिका मुख्यालय, शहागंज परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होते. सिमेंट रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. यात व्यावसायिकांसह ग्राहक म्हणून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक असते. अनेक बडे दुकानदार, हॉटेलचालकांकडे पार्किंगची जागा नसल्याने ग्राहक बाहेरच वाहने उभी करतात. रविवारी रात्री ९ वाजता सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मुठाळ सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. यावेळी भडकल गेट परिसरातील हॉटेल ग्रेट सागर बाहेर रस्त्यावरच एक कार उभी करण्यात आली होती. पोलिसांनी गाडीचालकाला जाब विचारला. हॉटेलचालकाने पार्किंग संपूर्ण भरले असल्याचे सांगितल्याने गाडी समोर लावल्याचे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलमालक मोहम्मद अजिजउद्दीन मुसा (वय ६८) यांच्यासह रस्त्यावर कार उभी करणारा ग्राहक अभिजित वसंत पठारे (वय २५, रा. जवाहर कॉलनी) या दोघांवरही गुन्हा दाखल केला.
रस्त्यावरच पानटपरी, अन्य दाेघांवर कारवाई
रस्त्यावर पानटपऱ्या उभ्या करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन व्यावसायिकांवरही सिटी चौक पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शेख अफरोज शेख खालेद (वय ४२, रा. हिलाल कॉलनी) व शेख शाहेद शेख खालेद (वय ३५, रा. दिल्ली गेट) अशी आरोपींची नावे आहेत. २७ डिसेंबरला रात्री १० वाजता ही कारवाई करण्यात आली.