पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा औरंगाबादेत तुफान राडा; भागवत कराडांच्या ऑफीसबाहेर हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 20:11 IST2022-06-12T19:42:36+5:302022-06-12T20:11:44+5:30
आज सकाळी बीडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला होता.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा औरंगाबादेत तुफान राडा; भागवत कराडांच्या ऑफीसबाहेर हाणामारी
औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकांसाठी चर्चेत होते. पण, त्यांना डावलण्यात आले. यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच नाराज झालेत. सकाळी बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीचा ताफा अडविण्यात आला होता. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर हाणामारी झाली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. सकाळी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भागवत कराड यांच्या औरंगाबाद येथील ऑफीसबाहेर राडा झाला. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. पंकजांच्या ज्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनीच आज भागवत कराडांच्या क्रांती चौकातील कार्यालयाकडे राडा घातला.
कार्यकर्ते ताब्यात
भागवत कराड यांच्या ऑफीसबाहेर कार्यकर्ते राडा घालणार असल्याची माहिती आधीच भागवत कराड यांच्या कार्यकर्त्यांना लागली होती, त्यामुळे ते देखील तयारीत होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलाच चोप देण्यात आला. या घटनेची पोलिसांनाही माहिती असल्याने, पोलिसांनी तात्काळ त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.