शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

संघर्षाची आगतिकता; 'मन की बात' ओठांवर आलीच नाही

By नजीर शेख | Published: January 28, 2020 2:06 PM

समाजसेवकाच्या भूमिकेतून हे उपोषण करीत असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना त्यांनी आणखीनच बुचकळ्यात टाकले.

ठळक मुद्देपरळीत व्यक्त केलेली मनातील खदखद औरंगाबादेत ओठावर आलीच नाही. संघर्षाची ती आगतिकताच म्हणावी लागेल.     

- नजीर शेख 

संघर्ष हा मुंडे घराण्याचा स्थायिभाव आहे. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, असे एकाच घरातील हे नेते संघर्षातून घडले. संघर्षाशिवाय तिघांनाही काही मिळाले नाही. गोपीनाथरावांच्या निधनानंतर पंकजा आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी सातत्याने संघर्ष करताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये सोमवारी झालेले त्यांचे लाक्षणिक उपोषण हा त्या संघर्षाचाच भाग होता. गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मात्र, या संघर्षात सद्य:स्थितीत पंकजांची कोंडी झाल्याचे दिसत आहे.२०१३ साली खासदार असताना गोपीनाथ मुंडे यांनी राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबादमध्ये दोन दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी पंकजाही त्यांच्याजवळ होत्या. मुंडेसाहेबांचा त्यावेळी सत्तेत नसले तरी राज्याच्या राजकारणात दबदबा  होता. त्याचपध्दतीचा दबाव आपण निर्माण करु शकू, या  भूमिकेने पंकजा यांनी उपोषणासाठी औरंगाबादचे तेच स्थळ निवडले. 

मुंडे कुटुंबाची जातकुळीच संघर्षाच्या पायावर उभी आहे. बैलगाडीवर रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या,  कारखान्याच्या आवारात खोपटी टाकून थंडीवारे सोसत जगणाऱ्या आणि रात्रीच्या अंधारातही हातातील कोयत्याने सपासप वार करीत हजारो एकर ऊस आडवा करणाऱ्या वंजारी समाजाचा संघर्षाचा गुण गोपीनाथरावांमध्ये होता. या गुणांमुळे ते कधी स्वस्थ बसले नाहीत. केवळ बंद दाराआडच्या शिबिरांमध्ये रमून चाणक्यनीतीचा आव आणणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रस्त्यावर उतरून संघर्ष करायलाही गोपीनाथ मुंडे यांनीच शिकवले. त्यांची कन्या पंकजा यांनीही त्यांचाच कित्ता गिरवत आपली वाटचाल चालू ठेवली आहे. मुंडे यांच्या काळात पक्षातील नेते प्रमोद महाजन यांची मोठी साथ लाभली. आता पंकजा संघर्ष करू पाहत आहेत आणि पक्षातील नेते त्यांच्या पायात बेडी अडकवून ठेवू पाहत आहेत. पंकजा यांच्या संघर्षाला धार येणार नाही, याची काळजी पक्षाच्या नेत्यांनी चार दिवसांपूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतली. संघर्षाची जागा इव्हेंटने घ्यावी, अशी सर्व तयारी करण्यात आली. त्यामुळे पंकजांचे उपोषण न होता औरंगाबादमधील भारतीय जनता पक्षाची ती एक साधी सभा ठरली.  

१९९४-९५ साली दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारविरुद्ध शिवनेरी ते शीवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली. १५० च्यावर सभा घेऊन राज्यातील वातावरण ढवळून टाकले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय घेऊन आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार शरसंधान करीत काँग्रेसची सत्ता उलथूृन टाकण्याच्या कामात मोठी मदत केली. राज्यात युतीची सत्ता आली आणि गोपीनाथराव उपमुख्यमंत्री झाले. २०१४ साली पंकजांनीही असाच पवित्रा घेतला. राज्यातील पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असलेल्या सरकारच्या विरोधात त्यांनी  सिंदखेडराजा ते चौंडी अशी संघर्ष यात्रा काढली. गोपीनाथरावांप्रमाणेच पंकजांनी राज्य पिंजून काढले. सत्ता आलीच तर राज्याचे नेतृत्व करायला मिळेल, अशी  इच्छाही त्यामागे होती. राज्यात सत्तांतर झाले. यावेळी तर युतीमध्ये भाजपचे अधिक आमदार निवडून आले. पंकजांना मुख्यमंत्रीपद तर नाहीच नाही, उपमुख्यमंत्रीपदही मिळाले नाही. ग्रामविकास मंत्रीपद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आणि यावेळेपासूनच खऱ्या अर्थाने पंकजांचा संघर्ष सुरू झाला. तो मागील पाच वर्षांपासून सुरूच आहे. 

परळी येथे १२ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर केल्याप्रमाणे औरंगाबादचे उपोषण झाले. परळीत जाहीर केलेल्या घोषणेतील रोख हा स्वपक्षीयांविरुद्ध होता. ज्या आवेशाने परळीमध्ये भाषण आणि घोषणा झाली, त्या संघर्षाची धार औरंगाबादच्या भाषणात नव्हती. त्यांनीच आधी जाहीर केल्याप्रमाणे हे उपोषण विद्यमान महाआघाडी सरकारच्या विरोधात नसून ते केवळ मराठवाड्यातील पाणीप्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केलेले उपोषण होते. त्यामुळे या उपोषणाच्या माध्यमातून  मुंडेसमर्थक कार्यकर्त्यांना जो संघर्ष अपेक्षित होता त्याचा पूर्ण अभाव उपोषणस्थळी दिसला. उलट पक्षभेद विसरून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाचा नेत्यांनी विचार करावा आणि  समाजसेवकाच्या भूमिकेतून हे उपोषण करीत असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना त्यांनी आणखीनच बुचकळ्यात टाकले. सायंकाळी भाषणाच्या वेळी पंकजांची प्रकृती खोकल्यामुळे थोडीशी खराब झाल्याचे जाणवले. आवाजातील बदलही जाणवत होता. त्यामुळे एरव्ही मुंडेसाहेबांच्या स्टाईलने होणारी पल्लेदार वाक्यांची संवादफेक झालीच नाही. 

आपले उपोषण हे विद्यमान सरकारच्या विरोधात नाही, हे पंकजांनी आधीच स्पष्ट केले. दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या उपस्थित नेत्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच हे उपोषण होत असल्याचे सांगून पंकजांना मोठेपणा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्षाची भाषा कुणाविरुद्ध करायची, असा पेच दिसला. भाषणाच्या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी ‘कोण आली रे कोण आली... बीडची वाघीण आली...’ अशा घोषणा देत पंकजांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जोरदार काही बोलावे, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, परळीत व्यक्त केलेली मनातील खदखद औरंगाबादेत ओठावर आलीच नाही. संघर्षाची ती आगतिकताच म्हणावी लागेल.     

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMarathwadaमराठवाडाWaterपाणी