Join us  

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवून हैदराबादला १ धावेने विजय मिळवून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 11:16 PM

Open in App

IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - राजस्थान रॉयल्सने पहिल्या षटकात दोन तगडे फलंदाज गमावूनही सनरायझर्स हैदराबादच्या नाकी नऊ आणले. २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या RR ला भुवनेश्वर कुमारने १ धावांवर दोन धक्के दिले. पण, यशस्वी जैस्वाल व रियान पराग या युवा जोडीने १३४ धावांची भागीदारी करून RR ला सामन्यात दमदार पुनरागमन करून दिले. SRH च्या घरच्या मैदानावर भयाण शांतता पसरलेली दिसली, ती या दोन फलंदाजांमुळे. यशस्वीचा ७ आणि रियानचा २४ धावांवर झेल सोडणे SRH ला महागात पडले. पॅट कमिन्सने त्याच्या अनुभवाचा वापर करून शेवटच्या षटकापर्यंत मॅच आणली. भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवून हैदराबादला १ धावेने विजय मिळवून दिला. 

SRH ची सुरुवात संथ राहिली आणि त्यांना पॉवर प्लेमध्ये २ बाद ३७ धावा करता आल्या. RR चा ट्रेंट बोल्ट व आऱ अश्विन यांनी पॉवर प्लेमध्ये चांगला मारा केल्या आणि त्यामुळे आवेश खान व संदीप शर्मा यांना विकेट मिळाली. नितीश कुमार रेड्डीने सामन्याचे चित्र बदलले आणि हेडसह ५७ चेंडूंत ९६ धावा जोडल्या. हेडने ४४ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. नितीश ४२ चेंडूंत ३ चौकार व ८ षटकांसह ७६ धावांवर नाबाद राहिला. क्लासेनने १९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या आणि हैदराबादने ३ बाद २०१ धावा उभ्या केल्या. नितीश व क्लासेन यांनी ३३ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली.  भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकाच्या पहिल्या ५ चेंडूंत सामन्याचा निकाल पक्का केला. त्याने जॉस बटलर ( ०) व संजू सॅमसन ( ०) यांना बाद केले. आयपीएलच्या पहिल्या षटकात सर्वाधिक २७ विकेट्स घेण्याच्या ट्रेंट बोल्टच्या विक्रमाशी भुवीने बरोबरी केली. मार्को यानसेनच्या चौथ्या षटकात यशस्वी जैस्वालचा झेल पॅट कमिन्सने टाकला. त्यानंतर यशस्वीने चार खणखणीत चौकार व सिक्स खेचला. त्याला रियान परागची दमदार साथ मिळाली आणि या दोघांनी संघाला १० षटकांत १०० धावांपर्यंत पोहोचवले. यशस्वीने चौकार खेचून ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठा रियान यानेही ३१ चेंडूंत फिफ्टी झळकावली. १४व्या षटकात यशस्वी स्वीप मारायला गेला अन् टी नटराजनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यशस्वीने ४० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ६७ धावांच्या खेळीसोबत रियानसह ७८ चेंडूंत १३४ धावा जोडल्या.  शेवटच्या ६ षटकांत ५९ धावा संघाला करायच्या होत्या. १६व्या षटकात पॅट कमिन्सने महत्त्वाची विकेट मिळवून दिली. रियान ४९ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांची स्फोटक खेळी केली.  शिमरोन हेटमायर व रोव्हमन पॉवेल यांनी ११ चेंडूंत २२ धावा जोडून RR चा संघर्ष कायम राखला होता. हेटमायरने १८व्या षटकात नटराजनला १०६ मीटर लांब षटकार खेचला. पण, पाचव्या चेंडूवर नटराजनने त्याची ( १३) विकेट घेतली. १२ चेंडूंत २० धावा RR ला हव्या होत्या. 

कमिन्सने त्याच्या पुढच्या षटकात ध्रुव जुरेलची ( १)  विकेट मिळवली, अभिषेक शर्माने सुरेख झेल घेतला. कमिन्सने १९व्या षटकात विकेटसह फक्त ७ धावा दिल्या. त्यामुळे ६ चेंडूंत १३ असा सामना आला, पण आर अश्विन स्ट्राईकवर आला. स्लो ओव्हर रेटमुळे SRH ला शेवटच्या षटकात पेनल्टी बसली आणि एक खेळाडू कमी त्यांना सर्कलबाहेर उभा करावा लागला. अश्विनने एक धाव घेऊन पॉवेलला स्ट्राईक दिली. पॉवेलने पुढील दोन चेंडूंवर २ व ४ अशा सहा धावा जोडल्या. आता ३ चेंडूंत ६ धावा त्यांना हव्या होत्या.  तिसऱ्या चेंडूवर खराब थ्रोमुळे पॉवेलला रन आऊट करण्याची संधी गमावली.  पुढच्या चेंडूवर पॉवेलने डाईव्ह मारून दोन धावा पूर्ण केल्या आणि १ चेंडू २ धावा असा सामना थरारक झाला. भुवीने शेवटच्या चेंडूवर पॉवेलला ( २७) पायचीत करून हैदराबादला १ धावेने सामना जिंकून दिला. 

टॅग्स :आयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्सयशस्वी जैस्वाल