‘पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर इम्तियाज जलीलांची ठाम भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 15:02 IST2025-05-07T15:00:50+5:302025-05-07T15:02:25+5:30
“सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात. आपण का हे सहन करायचे?”

‘पाकिस्तानला धडा शिकवायची गरज होती’; ‘ऑपरेशन सिंदूर’वर इम्तियाज जलीलांची ठाम भूमिका
छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ हवाई कारवाईवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील आपली परखड भूमिका मांडली आहे.
माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “सामान्य माणसांचे, पर्यटकांचे प्राण दहशतवाद्यांनी घेतले. यामुळे सर्व भारतीयांच्या मनात पाकिस्तानला एकदा धडा शिकवला पाहिजे असेच होते. ते भारतीय सैन्य दलांनी करून दाखवले आहे.”
“सातत्याने दहशतवादी देशात घुसखोरी करतात. आपण का हे सहन करायचे?” असा सवाल करून माजी खासदार इम्तियाज जलील यांनी “पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या सर्व ठिकाणी हल्ला करा.” अशी मागणी केली आहे. पाकिस्तानला कठोर शब्दासोबत कृतीतून उत्तर दिले पाहिजे, अशी सर्व भारतीयांची भावना होती. आता यापुढे अशा स्ट्राइक आणखी किती दिवस चालतील माहिती नाही, पण 'ऑपरेशन सिंदूर'चे आम्ही स्वागत करतो. भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन. असेही जलील म्हणाले.
या कारवाईमुळे देशभरात दहशतवादाविरोधात एकजूट दिसून आली आहे. राजकीय भिन्नता असूनही, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अनेक नेते एकत्र आले आहेत. अशा वेळी इतर देश बघ्याची भूमिका घेतात. ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याकडे पाहतात. आपली अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. युद्ध होतात तेव्हा याचे परिणाम आर्थिक बाबीवर होतात. अर्थ व्यवस्था आपण नंतरही उभी करू. भारताने स्वरक्षणार्थ दहशतवादी ठिकाणावर हल्ला केला आहे, पाकिस्तानला असा धडा शिकवला गेलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका माजी खासदार जलील यांनी मांडली.