पैठणची व्यापार पेठ पाण्याखाली, शहरातील १५८० रहिवासी; ११ गावांतील ४७९ कुटुंबांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:27 IST2025-09-29T12:26:19+5:302025-09-29T12:27:30+5:30
पैठण शहरातील सखल भागामध्ये रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी, तर व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली होती.

पैठणची व्यापार पेठ पाण्याखाली, शहरातील १५८० रहिवासी; ११ गावांतील ४७९ कुटुंबांचे स्थलांतर
पैठण : जायकवाडीतून अडीच लाख क्युसेकने गोदापात्रात विसर्ग करण्यात आल्याने रविवारी दुपारनंतर पैठण शहरासह सहा गावांमध्ये पाणी शिरले होते. या पार्श्वभूमीवर सखल भागातील रहिवाशांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवले. यात पैठण शहरातील १ हजार ५८० रहिवासी, तर ११ गावांतील ४७९ कुटुंबीयांची आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने इतरत्र व्यवस्था केली आहे.
पैठण शहरातील सखल भागामध्ये रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी, तर व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्यास सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानक परिसरासह साठेनगर, परदेशीपुरा, कहार वाडा, हमाल गल्ली, प्रतिष्ठान कॉलेजमागील काही रहिवासी, संतनगर, गागाभट्ट चौक परिसरासह सखल भागातील लहुजीनगर, जैनपुराचा काही भाग आदी भागांतील १ हजार ५८० रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. नाथ हायस्कूल, प्रतिष्ठान महाविद्यालय, कन्या प्रशाला, झेंडूची महाराज मठ, शिवनेरी मंगल कार्यालय आदी ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे. स्थलांतरित नागरिकांना पाणी, जेवण, उपवासाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. पाणी वाढत असल्यामुळे आणखी नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था करण्यात येत असल्याचे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी सांगितले.
चारशेवर दुकाने रिकामी
पैठण शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी करण्याची लगबग केली. येथील सहाशे दुकानांपैकी सुमारे साडेतीनशे व इतर भागांतील ५० ते ६० दुकानांमधील सामान, साहित्य व्यापाऱ्यांनी इतरत्र हलवले. २००६ मधील अनुभव लक्षात घेता व्यापाऱ्यांनी कोणतीही जोखीम पत्कारण्याऐवजी दुकानांतील माल हलवण्यास प्राधान्य दिल्याचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे व मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांनी सांगितले.
१९ वर्षांनंतर पूल पाण्याखाली, नगरचा संपर्क तुटला
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा गोदावरी नदीवर पैठण शहराजवळ असलेला पाटेगाव पूल १९ वर्षांनंतर पाण्याखाली गेला आहे. २००६ मध्ये अडीच लाख विसर्ग केला तेव्हा हा पूल पाण्याखाली गेला होता. रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास या पुलावरून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली.
शहरातील कुठे, कितीजणांची व्यवस्था?
ठिकाण, नागरिकांची संख्या
नाथ हायस्कूल ४९०,
प्रतिष्ठान महाविद्यालय २४५,
कन्या प्रशाला २९४,
झेंडूची महाराज मठ १५०,
शिवनेरी मंगल कार्यालय १२५
एकूण १५८० नागरिक
ग्रामीण भागातील स्थलांतरित केलेली कुटुंबे
गाव, कुटुंबे
कावसान १३५,
दादेगाव ४,
नायगाव २८,
वडवाळी ३६,
चनकवाडी २,
तेलवाडी ४०,
आपेगाव ५,
नवगाव २०,
मायगाव ५,
कुरणपिंपरी ५,
हिरडपुरी ४
एकूण ४७९ कुटुंब
नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने पैठण शहरातील दीड हजार रहिवासी, तर ११ गावांतील पाचशे कुटुुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. विसर्ग वाढण्याच्या शक्यतेमुळे आणखी काही नागरिकांचेही स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
- ज्योती पवार, तहसीलदार
सतर्क राहावे
रविवारी रात्री आठ वाजता नाशिकचे पाणी येण्यास सुरुवात झाली असून ३ लाख ५५ हजार १८६ क्युसेक आवक होत आहे. त्यामुळे सर्व दरवाजे साडेनऊ फुटांनी उघडून २ लाख ५४ हजार ६६४ क्युसेक विसर्ग करण्यात आला. नागरिकांनी सतर्क राहावे.
- प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, जायकवाडी.